ऑडिओ कादंबरी

335

>>प्रज्ञा घोगळे<<

बदलत्या काळानुसार आता कादंबरी, कथा बसून वाचण्याची आवश्यकता नाही. स्नॉवेल या ऍपच्या माध्यमातून मान्यवर लेखकांच्या कादंबऱ्या तुमच्या मोबाईलवर ऐकू शकता.

कादंबरी म्हटलं का साधारणतः अधिक लांबीचे काल्पनिक कथा असलेले गद्य लेखन यास कादंबरी म्हटले जाते. कादंबरी ही सर्व भाषेमध्ये उपलब्ध असून ती प्रेम कथा, रहस्य कथा किंवा गूढ कथा या स्वरूपात असते. आतापर्यंत कादंबरी ही स्वतः वाचली जायची किंवा वाचून दाखविण्यात यायची. परंतु मंडळी आता तुम्हाला अशाच सुंदर कादंबऱ्या एका ऍप्लिकेशनद्वारे ध्वनिमुद्रित स्वरूपात अनोख्या पद्धतीने अनुभवायला मिळतील.

स्नॉवेल या ग्रुपमुळे मराठी साहित्याविषयी गोडी असणारी सर्व मंडळी एकत्र आली असल्याचे दिग्दर्शक अनिरुद्ध जोशी यांनी सांगितले. सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच भविष्य ही डिजिटल असल्यामुळे कादंबरी स्वतः वाचण्यापेक्षा ती ध्वनिमुद्रित स्वरूपात ऐकण्यात एक वेगळी मजा असून रसिकांना ही ते आवडेल असे संस्थापक समीर धामणगावकर यांना वाटले आणि त्यांनी तर काय मग स्नॉवेल ऍप्लिकेशन तयार करण्याचे ठरवले.

अनेक मान्यवरांचा सहभाग

स्नॉवेल याऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला मुन्शी प्रेमचंद यांच्यासारख्या मोठय़ा लेखकांच्या कादंबऱ्या अनुभवायला मिळतील. यामध्ये प्रेमचंद यांची लॉटरी नावाची सर्वात जुनी ऑडियो कादंबरी मराठीत भाषांतर करण्यात आली आहे. प्रकाश नारायण संत यांच वनवास हे पुस्तक ऑडियो स्वरूपात असून ज्योती सुभाष, सतीश आळेकर, श्रीरंग महाजन या कलाकारांनी या कादंबरीला आवाज दिला आहे. तसेच डॉ. जयंत नारळीकर यांनी प्रेक्षित या नावाची वैज्ञानिक कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीला सुबोध भावे, डॉ. गिरीष ओक यांनी आवाज दिला आहे. त्याचप्रमाणे मिलिंद बोकील यांची समुद्र, प्रकाश बाबा आमटे यांची आमचे जंगली मित्र, प्रभाकर पेंढारकर यांची राणांगण, गो.वि. दांडेकर यांची शितू व जिम कॉर्बेट यांची चौघडचे वाघ अशा वेगवेगळ्या लेखकांच्या कादंबऱया या ऍप्लिकेशनमध्ये ऑडियोच्या स्वरूपात ऐकवण्यात येतात. मग चला तर मंडळी आता आपणही आपल्या सोबत कोणत्याही कादंबरीचे वजन न उचलता आपणास हवी असलेली कादंबरी न वाचता मोबाईल ऑन करून कुठेही फक्त ऐकू शकतो. आहे की नाही अनोखी स्वरूपातील ध्वनिमुद्रित कादंबरी.

एकूण 38 कादंबऱ्या

या स्नॉवेल ऍप्लिकेशनमध्ये मोठ मोठ्या लेखकांच्या एकूण ३८ कादंबऱ्या आहेत. या कादंबऱया चित्रपट आणि नाटकाप्रमाणे ध्वनिमुद्रित स्वरूपात या कथा ऑडियोच्या माध्यमातून ऐकवल्या जातात. यात चित्रपट व नाटकाप्रमाणे दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, कलाकार, डबिंग करणारे व्यक्ती अशी त्यांची टीम आहे. यामध्ये ऑडियो बुक्स तयार करताना त्याकरता रीतसर लेखन करून चित्रपटाप्रमाणे प्रक्रिया केली जाते. तसेच प्रत्येक पात्रातल्या कथेला सूट होणारा आवाज निवडला जात असून त्या संवादामध्ये विविधता आणण्याकरता त्याला म्युझिक ही देण्यात येते. जेणेकरून रसिकांना ती कादंबरी ऑडियोच्या अनोख्या स्वरूपात ऐकायला मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या