भाजपचे राजकीय दात घशात, महापालिकेवर ‘वॉच’ ठेवणारा अधिकारी वर्षभरातच माघारी

19

सामना प्रतिनिधी । मुंबई

महापालिकेवर वॉच ठेवण्यासाठी महापालिकेचा लेखाजोखा मांडण्यासाठी राज्य सरकारने वर्षभरापूर्वी सुरेश कचरू बनसोडे या अधिकाऱ्याला महालेखा परीक्षकाच्या खुर्चीत आणून बसवले. पण बनसोडे यांनी वर्षभरातच असे काही कारनामे केले की, सरकारला त्यांची उचलबांगडी करावी लागली आहे. प्रशासकीय कामात हलगर्जीपणा असे बनसोडेंच्या बदलीचे कारण सांगितले जात असले तरी महापालिकेत मात्र भ्रष्टाचाराचीच चर्चा अधिक आहे. महापालिकेच्या कामकाजात राजकारण करणाऱया भाजपचे बनसोडेनीच दात घशात घातल्याची कुजबुजही रंगू लागली आहे.

सुरेश बनसोडे हे शासनाच्या लेखाजोखा विभागाचे सहाय्यक संचालक म्हणून काम पाहत होते. भाजपने राजकारण केले आणि बनसोडेंना महापालिकेवर वॉच ठेवण्यासाठी पाठवले. महापालिकेच्या लेखा परीक्षकपदी बाहेरच्या अधिकाऱयाची नियुक्ती होण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना होती. दरम्यान, पालिकेच्या ऑडिट खात्यातील अधिकाऱयांनी या नियुक्तीस आक्षेप घेतला आणि ते न्यायालयात गेले. बाहेरच्या अधिकाऱयाला महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास न्यायालयानेही स्थगिती दिली. त्यामुळे बनसोडे यांना सूत्रे स्वीकारता आली नव्हती. बनसोडे मंत्रालयातही गेले नव्हते. काही दिवसांनी न्यायालयाने स्थगिती उठवली आणि सरकारचा मार्ग मोकळा झाला. बनसोडे लेखा परीक्षकाच्या खुर्चीत विसावले.

बनसोडे यांना वर्षभरातच माघारी बोलावण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. बनसोडे यांनी प्रशासकीय कामकाज नीट हाताळले नाही, अशी शासकीय सबब सांगत प्रशासनाने बनसोडे यांच्या बदलीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

फाईलचे फोटो काढताना पकडले

ठेकेदाराला मदत करणे बनसोडेना महागात पडल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. वरळी येथे महापालिकेचे इंजिनीयर्स हब आहे. या हबमध्ये ऑडिट खात्यातील आपल्या विश्वासू अधिकाऱयाला पाठवून एका फाइलमधील कागदपत्रांचे फोटो काढल्याचे बनसोडेंवर आरोप आहेत. हे काम एका मर्जीतील ठेकेदाराला मदत करण्यासाठीच सुरू होते असेही सांगण्यात येते. या प्रकरणाची चौकशी सुरू असून हेच प्रकरण बनसोडे यांना भोवल्याचे सांगण्यात येते. बनसोडे मात्र यावर प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या