मजुरांना शाळेत डांबल्याप्रकरणी खंडपीठाची सुमोटो याचिका

364

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी परप्रांतीय मजुरांना आहे तिथेच थांबवताना संभाजीनगरातील प्रशासनाने त्यांना गारखेड्यातील मनपाच्या शाळेतच डांबले व ते पळून जाऊ नये म्हणून बाहेरून कुलुपही लाऊन घेतल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.

संभाजीनगर शहरातील काही परप्रांतीय मजूर हे त्यांच्या गावी पायी निघाले असता प्रशासनाने 51 मजुरांना रस्त्यात अडवून गारखेडा परिसरातील मनपा शाळेत ठेवले. आश्रय देण्यात आला आहे. हे मजूर तामिळनाडू, उत्तरप्रदेश, बिहार आदी राज्यातील आहेत. या ठिकाणी सोशल डिस्टंटींगचा नियमही पाळला गेला नाही. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.

या मजुरांच्या वृत्ताची तसेच वाळूज परिसरातील परप्रांतीय मजुरांची उपासमार होत असल्याचेही वृत्त आले होते. त्याची दखल घेऊन खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली. प्राथमिक सुनावणीत न्यायामूर्ती प्रसन्ना वराळे यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना नोटीसा बजावण्याचे आदेश देण्यात आले.

या प्रकरणात सरकारकडून अ‍ॅड्. श्रीपाद दंडे हे बाजू मांडणार आहेत तर अ‍ॅमिकस क्युरी म्हणून अ‍ॅड्. अमोल जोशी यांना नियुक्त करण्यात आले आहे. पुढील सुनावणी ८ एप्रिल रोजी अपेक्षित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या