मुख्यलेखाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक, नगरसेविकेने संतापाच्या भरात भिंतीवर डोके आपटले

1205

महापालिकेचे मुख्यलेखाधिकारी सुरेश केंद्रे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त केला. केंद्रेवर आत्ताच कारवाई करा, अशी मागणी करताना त्यांना अक्षरशः गहिवरून आले. कारवाई करा अन्यथा सभागृहातच आत्महत्या करेन, असा इशारा त्यांनी दिला. तेव्हा सभागृहात आलेल्या केंद्रेंना नगरसेवकांच्या मागणीवरून महापौरांनी बाहेर जाण्यास सांगितले. केंद्रे बाहेर जाण्यास निघताच गायके यांनी त्यांचा रस्ता अडवला. महिला सुरक्षारक्षकांनी त्यांस विरोध केला. संताप अनावर झाल्यामुळे गायके यांनी भिंतीवर डोके आपटून घेतल्यामुळे त्यांना चक्कर आल्या व त्या जमीनीवर कोसळल्या. त्यामुळे सर्वांचीच धांदल उडाली.

शिवसेना नगरसेवकाचा मनपाच्या सभेत आत्मदहनाचा प्रयत्न

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सकाळच्या सत्रात नगरसेविका मीना गायके यांनी आपल्या वॉर्डातील दूषित पाणीप्रश्न मांडत तत्काळ जलवाहिनीच्या दुरूस्तीची मागणी केली होती. कंत्राटदार थकीत बिले मिळत नसल्याने काम करत नसल्याचे सांगत त्यांनी कंत्राटदाराचे बिल देण्याचीही मागणी केली होती. तेव्हा महापौर नंदकुमार घोडेले यांनी सभेच्या मध्यान्ह सुटीत केंद्रेना भेटा, असे सूचवले होते. त्यानुसार दुपारी सभा तहकूब झाल्यानंतर गायके या केंद्रेकडे त्यांच्या दालनात गेल्या होत्या. दुपारी सभा पुन्हा सुरू होताच गायके यांनी संताप व्यक्त करत वारंवार सांगूनही केंद्रे ऐकत नाही. मी त्यांच्याकडे गेले असता त्यांनी अपमानास्पद वागणूक देत निघून गेले, असे सांगताना त्यांना गहिवरून आले. आजच त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा मी सभागृहातच आत्महत्या करेन, असा इशारा गायके यांनी दिला. नगरसेवक त्र्यंबक तुपे यांनी महिला नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या केंद्रेंवर कारवाई करा, त्यांना तत्काळ परत पाठवा, नगरसेविकांचा अपमान कदापिही सहन करुन घेतला जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे सांगितले. तेव्हा महापौर घोडेले यांनी केंद्रे यांना सभागृहात बोलावण्याचे आदेश दिले. त्यांनतर केंद्रे सभागृहात दाखल झाले. दरम्यान, सभागृहाचे वातावरण संतप्त झाले होते. नगरसेवक व महापौरांनी गायके यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी आता शांत बसणार नाही. असे गायके म्हणत असतानाच सर्व नगरसेविका एकवटल्या आणि महापौरांच्या आसनासमोर जाऊन त्यांनी संताप व्यक्त केला. सभागृहाच्या भावना महापौरांच्या लक्षात आल्या. त्यांनी लगेच विषयपत्रिका मंजुरीसाठी घेत केंद्रेंना राज्य शासनाकडे परत पाठविण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी घेतला. हा प्रस्ताव मंजुर करतानाच महापौर नंदकुमार घोडेले यांनी केंद्रेना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. केंद्रे सभागृहाबाहेर जाण्यास निघाले, तेव्हा मध्येच संतप्त गायके यांनी त्यांचा रस्ता अडवला. तोच महिला सुरक्षारक्षक सरसावल्या व त्यांनी गायकेंना अटकाव केला. यावेळी गायके व महिला सुरक्षारक्षकांत झटापट झाली. संताप अनावर झाल्याने गायके यांनी भिंतीवर डोके आपटून घेतले. तोच त्यांना चक्कर आली व त्या जमीनीवर कोसळल्या. त्यामुळे सर्वांचीच धांदल उडाली. महापौरांनी विषयपत्रिकेतील दोन प्र्रस्ताव वगळता सर्व विषयांना मंजुरी देत सभा संपवली.

gayake

केंद्रेंच्या खोटेपणाचा शिंदेनी दिला पुरावा
स्थायी समितीच्या बजेटवरील बैठकीला आपण आजारी असल्यामुळे येऊ शकलो नाही, असे कारण देणाऱ्या मुख्य लेखाधिकारी केंद्रेंच्या खोटारडेपणाचा राजू शिंदे यांनी सभागृहात पुरावा देत भंडाफोड केला. 28ऑगस्टच्या स्थायी समितीच्या बैठकीच्या दिवशी केंद्रे हे महापालिकेतच होते, त्यांनी या दिवशी धनादेशांवर स्वाक्षरी केल्याचे पुरावे शिंदे यांनी सभागृहात दाखवले. नियम डावलून बिले वाटप केली, त्यामुळे केंद्रेची विभागीय चौकशी करावी, अशी मागणीही शिंदेंनी केली.

मुख्यलेखाधिकारी केंद्रेंना बाहेरचा रस्ता
सभागृहातील गोंधळानंतर महापौर घोडेले यांनी मुख्यलेखाधिकारी केंद्रे यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांची स्वतः आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी चौकशी करावी असे आदेश प्रशासनाला दिले. तसेच केंद्रेना परत राज्य शासनाकडे पाठविण्याचा 1152 क्रमांकाचा प्रस्ताव मंजुर करत त्यावर कार्यवाही करण्याचेही आदेशित केले. यापुढे महिला नगरसेवकांची विनम्रतेने वागा, अशी ताकिदही सर्व अधिकाऱ्यांना दिली. या सभेत उपायुक्त मंजुषा मुथा यांनाही शासनाकडे परत पाठविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव व सफारी पार्कच्या नामकरणाचा प्रस्ताव स्थगित ठेवत महापौरांनी सर्वच विषयांना मंजुरी दिली.

gayake2

गायकेंना उपचारासाठी सिग्मात हलवले
नगरसेविका मीना गायके यांना सभेत संताप अनावर झाल्याने त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे त्यांना सभागृहातच चक्कर येऊन त्या खाली पडल्या. तेव्हा सर्व नगरसेविकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता. नगरसेवकांनी त्यांना बाजूला करत उठवत बाकावर बसवले. नंतर आरोग्य विभागाची अ‍ॅम्ब्युलन्स मनपात दाखल झाली. उपचारासाठी त्यांना सिग्मा हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या