‘सीएए’विरोधी आंदोलक देशद्रोही नाहीत, उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे स्पष्ट मत

500

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात जे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहेत. त्यांना ते करण्याचा अधिकार आहे. त्यांना देशद्रोही किंवा गद्दार ठरवले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने व्यक्त केले आहे.

माजलगावमध्ये सीएएविरोधात आंदोलन करण्यासाठी काही नागरिकांनी परवानगी मागितली होती. ती परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली होती. यानंतर या नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीवेळी शांततापूर्ण आंदोलन करण्यात काहीच गैर नाही. सरकारविरोधात आंदोलन करतात म्हणून ते दडपून टाकता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाने यासाठी ब्रिटिशांचेही उदाहरण दिले. ब्रिटिश जेव्हा हिंदुस्थानवर राज्य करत होते त्यावेळी स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढा देण्यात आलाच होता. त्यामुळे शांततापूर्ण आंदोलन करण्यात गैर काय? असा प्रश्न न्यायालयाने आंदोलनास परवानगी नाकारणाऱ्या प्रशासनाला करत शांततापूर्ण आंदोलन करण्यास संमती दिली.

प्रकरण काय?
सीएए व एनआरसीच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी इफ्तिकार शेख यांनी परवानगी मागितली होती. माजलगावातील जुन्या ईदगाह मैदानात हे आंदोलन करण्याची त्यांची योजना होती, मात्र कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत बीड जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाNयांनी परवानगी नाकारली होती. त्याचाच आधार घेत माजलगाव शहर पोलिसांनीही निदर्शनांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर शेख यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने त्यांचा शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार मान्य करत दंडाधिकारी व पोलिसांचा हा आदेश रद्दबातल ठरवला.

मुंबईत आझाद मैदानात आंदोलन
सीएए, एनआरसीविरोधात मुंबईत शनिवारी आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात एकूण ६५ संघटना सहभागी झाल्या. ‘संविधान बचाओ’, ‘भारत बचाओ’ अशा घोषणा देत मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये फक्त मुसलमानच नाही तर इतर धर्माच्या संघटनाही या शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

काय म्हणाले न्यायालय
– अहिंसेच्या मार्गाने झालेल्या आंदोलनांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशातील लोक आजही अहिंसक आंदोलनाचा मार्ग वापरतात. लोकांचा अहिंसेवर विश्वास असणे ही बाब खूपच आश्वासक आहे.

– ब्रिटिश राजवटीत आपल्या पूर्वजांनी स्वातंत्र्य व मानवी हक्कांसाठी मोठा संघर्ष केला. त्या संघर्षामागील तत्त्वज्ञानावरच आपली राज्यघटना बनली आहे.

– आपल्याच सरकारविरोधात लोक आंदोलन करतात ही खरे तर दुर्दैवाची बाब आहे, म्हणून त्यांचे आंदोलन चिरडले जाऊ शकत नाही.

शाहीनबागमधील आंदोलक आज अमित शहांना भेटणार
सीएएविरोधात दिल्लीतील शाहीनबागमध्ये धरणे आंदोलनाला बसलेल्या महिला वेंâद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी दुपारी २ वाजता भेट घेणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री शहा यांनी पुढच्या तीन दिवसांत सीएएच्या मुद्द्यावर कुणालाही आपली भेट घेऊन चर्चा करता येईल, असा प्रस्ताव आंदोलकांसमोर ठेवला होता. हा प्रस्ताव आंदोलकांनी स्वीकारला आहे. मात्र आंदोलकांमध्ये यावरून मतभेद आहेत. एक गट चर्चेच्या बाजूने तर एका गटाचा चर्चेला विरोध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या