कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी प्रशासन सज्ज, मनपा प्रशासकांचा दावा

कोरोना संसर्गाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी संभाजीनगर महापालिकेचे प्रशासन सज्ज आहे. आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ उपलब्ध आहे. औषधी आणि किटस् देखील पुरेसे आहेत असा दावा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून देश आणि राज्य पातळीवर तयारी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने केलेल्या तयारी बद्दल पत्रकारांनी विचारले असता आस्तिककुमार पाण्डेय माहिती देत होते.

पाण्डेय म्हणाले, कोविड केअर सेंटर्स मधून चार हजार बेडस् ची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था आज देखील कायम आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये दोन हजार बेडस् ची व्यवस्था आहे. कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी म्हणून डॉक्टर्स, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्या जानेवारी अखेरपर्यंत कायम राहतील, त्यात कपात केली जाणार नाही असे प्रशासकांनी स्पष्ट केले.

आयसीयू, व्हेंटिलेटर्स, ऑक्सीजन बेड्स रिकामे

संभाजीनगर जिल्ह्याची एकत्रित माहिती देताना पाण्डेय म्हणाले, जिल्ह्यात ५४४ आयसीयू बेडस् आहेत, त्यापैकी सध्या ५२३ बेडस् रिकामे आहेत. २०९ व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून १९९ व्हेंटिलेटर्सचा सध्या उपयोग होत नाही ते रिकामेच आहेत. १७५५ ऑक्सिजन बेडस् आहेत, त्यापैकी १७०७ बेडस् रिकामे आहेत. जिल्हाभरात कोविड केअर सेंटर्स मधून ६७०४ बेडस् आहेत, त्यांच्यापैकी ६७४४ बेडस् रिकामे आहेत. त्यामुळे आवश्यक ती पायाभूत सुविधा तयार आहे, मनुष्यबळ देखील आहे. औषधी आणि ऑक्सिजन देखील पुरेसा आहे. २६४७० पीपीई किटस्, ६८ हजार एन-९५ मास्क उपलब्ध आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचे किटस् देखील पुरेसे आहेत आणि आता नव्वद टक्के चाचण्या आरटीपीसीआर पध्दतीच्याच केल्या जाणार आहेत असे पाण्डेय यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या