खाकी वर्दीत दारूची तस्करी, चौघांना अटक

621

कडक लॉक डाउनच्या काळात खाकी वर्दीत शहरात विदेशी दारूची तस्करी करणाम क्रांतीचौक ठाण्याचा कर्मचाऱ्यांसह चार जणांना बदनापूर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून विदेशी दारूचे बॉक्स आणि कार असा एकुन सात लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

संभाजीनगर शहर रेड झोनमध्ये असल्याने जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात देशी, विदेशी दारू बंदी कायम ठेवली आहे, तर जालना जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या अल्प असल्याने या जिल्ह्यात वाइनशॉप व देशी दारू दुकांनाना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे संभाजीनगर शहरातील अनेक जण हे दारू मिळविण्यासाठी जालना जिल्ह्यात प्रवेश करून वाहनातून दारू नेत असल्याचे समोर आले आहे. २७ मे रोजी जालना येथून (एम.एच.-२०, ई.जी.-९२१२) या टॉयटो कंपनीच्या कारमध्ये विदेशी दारू पोलीस खाकी वर्दीत तस्करी करत असल्याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलीस निरीक्षक एम.बी. खेडकर यांच्या पथकाने सापळा रचून पोलीस ठाण्यासमोर कार अडवली असता कारमध्ये एक पोलीस कर्मचारी व अन्य तीन जण बसलेले दिसले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये महागड्या विदेशी दारूचे ४ बॉक्स व १ फुटलेला बॉक्स मिळून आला. दारूचे बॉक्स त्यांनी जालना शहरातील दीपक व रुपम या दोन वाइन शॉपमधून खरेदी करून संभाजीनगरात नेत असल्याचे सांगितले.

या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस जमादार श्याम रघुनाथ मोहळ याच्यासह सतीश शिवाजी देखणे, जितेंद्र अशोक चोटलानी, अविनाश अशोक चोटलानी यांच्यासह दीपक वाइन शॉप व रुपम वाइन शॉप चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आपली प्रतिक्रिया द्या