संभाजीनगर – 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे आजपासून लसीकरण

केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे 21 जूनपासून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकारने लसीची उपलब्धता विचारात घेऊन 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी उद्या शनिवार, 19 जूनपासून लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे. महापालिकेकडे 50 हजार लसीचा साठा उपलब्ध असल्यामुळे प्रायोगिक तत्वावर दहा केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था केली जाणार असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. दरम्यान ग्रामीण भागातही लसीकरणासाठी आठ केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. 16 जूनपासून लसीकरणाला सुरूवात झाली आहे. या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, विदेशी शिक्षणासह नोकरीला जाणारे नागरिक, दिव्यांग, बेघर यांच्यासह 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे 1 मेपासून लसीकरण करण्याचा निर्णय जाहिर केला होता. मात्र लस उपलब्ध होत नसल्यामुळे या वयोगटातील लसीकरणाला ब्रेक लावण्यात आला. शहरात महापालिकेने लसीकरण मोहिम राबविण्यासाठी 115 वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. आतापर्यंत 3 लाख 35 हजार 169 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्य सरकारने 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने शहरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी उद्या शनिवार, १९ जूनपासून लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. याकरिता प्रायोगिक तत्वावर दहा केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था केली जाणार आहे. सकाळी दहा ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल. असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.

ओळखपत्र सोबत आणावे

नागरिकांनी लसीकरणाला येताना सोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स, पासपोर्ट, निवडणूक कार्ड या पैकी एक फोटो असलेला ओळखीचा पुरावा म्हणून सोबत आणावा. लस घेण्यासाठी येताना जेवण करुन यावे. काही आजार असल्यास केंद्रावरील डॉक्टरांना कळवावे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या