कोरोनामुळे पतीचे निधन, पत्नीने जुळ्या मुलांसह केली आत्महत्या

1514

कोरोनाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत केले असून या आजाराने संभाजीनगर शहरातील अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोना संसर्गाने निधन झाल्याने सर्व जबाबदारी पत्नी वर पडली. मात्र पतीच्या जाण्याचा विरह सहन न झाल्याने पत्नीने आपल्या जुळ्या मुलांसह हाताच्या नसा कापून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यामध्ये माय-लेकीचा मृत्यू झाला तर मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे ही दुःखद घटना गार खेड्यातील भारत नगर येथे घडली.

समीना (42) व रूस्तूम शेख रा. गारखेडा यांचा पंचवीस वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. प्रेम विवाहानंतर हे दांपत्य गुण्यागोविंदाने सुखात संसार करत होते. त्यांना सतरा वर्षांपूर्वी दोन जुळी अपत्ये झाली होती. मुलीचं नाव आयुष्या तर मुलाचे नाव समीर असे ठेवले होते. बांधकाम व्यवसायिक म्हणून काम करणाऱ्या रुस्तुम शेख यास कोरोना संसर्गाची लागण झाली होती त्यातच रुस्तुमचा शुक्रवारी 31 जुलै रोजी मृत्यू झाला. रुस्तम आणि समीना यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. रुस्तुमच्या मृत्यूमुळे समीना पूर्ण खचली होती. जीवापाड प्रेम करणाऱ्या पतीचा मृत्यू झाल्याचा विरह तिला सहन होत नव्हता. याबाबत तिने नातेवाईकांना बोलूनही दाखविले होते घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कदाचित समीना असे बोलत असेल म्हणून नातेवाईकांनी तिची समजूत काढून धीर देण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे समीना व मुलं जेवल्यानंतर ते आपापल्या खोलीत झोपायला गेले. समीनाने आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहिली. अगोदर गळफास घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर तिने ब्लेड व धारादार चाकूने मुलांच्या व स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेतल्या. रक्तस्राव झाल्याने तिघेही बेशुध्द पडले होते. दरम्यान सकाळी शेजारी राहणारे अमोल माने यांना समीना यांच्या घरात काहीच हालचाल दिसत नसल्यामुळे त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून कुठलाही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा समीना आणि मुलगी बेशुद्धावस्थेत बेडवर तर समीर बेड जवळ खाली आढळून आला नातेवाईकांनी तातडीने तिघांनाही एमजीएम रुग्णालयात दाखल केले. समीना आणि आयुष्या या दोघींना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर समीर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या