संभाजीनगर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा

535

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या संभाजीनगर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला. महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना शेळके व त्यांच्या विरोधातील ऍड. देवयानी डोणगावकर यांना समान मते मिळाल्यामुळे चिठ्ठीचा कौल घेण्यात आला. यात मीना शेळके यांनी बाजी मारली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थकांनी भाजपला मदत केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शुभांगी काजे यांचा निसटता पराभव झाला.

संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवारी घेण्यात आली होती, मात्र एका सदस्याच्या मतावरून गोंधळ उडाला आणि पीठासीन अधिकारी भानुदास पालवे यांनी सभा तहकूब केली होती. तहकूब सभा आज दुपारी पुन्हा बोलावण्यात येऊन अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी फेरमतदान घेण्यात आले. महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना शेळके व ऍड. देवयानी डोणगावकर यांना समान 30 मते पडली. त्यामुळे पीठासीन अधिकाऱयांनी चिठ्ठीचा कौल घेण्याचे जाहीर केले. समर्थ संजय मिटकर या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. या चिठ्ठीचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने गेला. काँग्रेसच्या मीना शेळके यांना विजयी घोषित करण्यात आले. महाविकास आघाडीचा विजय होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

सत्तार समर्थकांची भाजपला मदत

उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शुभांगी काजे व भाजपचे लहानू गायकवाड यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार समर्थक सदस्यांनी भाजपला मदत केल्यामुळे शुभांगी काजे यांचा अवघ्या चार मतांनी निसटता पराभव झाला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरनारे, आमदार उदयसिंग राजपूत, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आदींची उपस्थिती होती. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शीतल बनसोड मतदानापासून वंचित

जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शुक्रवारच्या सभेस गैरहजर असलेल्या सिल्लेगाव सर्कलच्या सदस्या शीतल बनसोड या आज हजर झाल्या. सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अगोदरच सुरू झाल्यामुळे त्यांना मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्यास पीठासीन अधिकाऱयांनी परवानगी दिली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या