बंद दरवाजाआड रंगला सामना, ना हस्तांदोलन, ना प्रेक्षक; मैदानाबाहेरील चेंडूही…

1708

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस या साथीच्या रोगाचा प्रभाव क्रीडा क्षेत्रावरही पडत आहे. अनेक देशांमधील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या, काही लांबणीवर टाकण्यात आल्या तर काही बंद दाराआड अर्थात प्रेक्षकांविना पार पडत आहेत. शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघातील सामनाही बंद दरवाजाआड झाला.

कोरोनामुळे या लढतीसाठी फक्त खेळाडू आणि संबंधित अधिकाऱ्यांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. या लढतीत कोरोनाच्या धास्तीमुळे नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी, खेळाडूंनी हस्तांदोलनही केले नाही. मात्र खेळाडूंनी पायाला पाय भिडवून अभिवादन केले. तसेच या लढतीसाठी मैदानात एकही प्रेक्षक उपस्थित नसल्याने खेळाडूंनी षटकार मारल्यानंतर क्षेत्ररक्षकाला गॅलरीमध्ये जाऊन चेंडू आणावा लागत होता.

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 19 षटकात पहिल्या चेंडूवर सलामीवीर अॅरॉन फिंच याने सोढीच्या चेंडूवर जोरदार फटका मारला आणि चेंडू पवेलियनमध्ये जाऊन पडला. मैदानात प्रेक्षक नसल्याने न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षक लॉकी फर्ग्यूसन याला स्टँडसम्ये जाऊन चेंडू आणावा लागला. याचा व्हिडीओ नेटकऱ्यांनी शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाचा 71 धावांनी विजय

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांमध्ये 7 बाद 258 धावा करत न्यूझीलंडला विजयासाठी 259 धावांचे आव्हान दिले. ऑस्ट्रेलियाकडून वॉर्नरने 67, फिंचने 60 आणि मार्नस लाबुशेन हिने 56 धावांची अर्धशतकीय खेळी केली. यानंतर कमिन्स आणि मिशेल मार्शच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडचा डाव 187 धावांमध्ये गुंडाळत 71 धावांनी विजय मिळवला. कमिन्स आणि मिशेल मार्शने प्रत्येकी 3 बळी घेतले, तर जोश हेझलवूड आणि अॅडम झंपा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

आयपीएल लांबणीवर 

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आयएएनएस (IANS) ला दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा आयपीएल हंगाम लांबवणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता ही स्पर्धा 29 मार्च नाही तर 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व फ्रॅचाईजींना बीसीसीआयने याबाबत माहिती दिल्याचेही ते म्हणाले. केंद्र सरकारने 15 एप्रिलपर्यंत सर्व व्हिसा प्रक्रिया थांबवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या