तिसऱ्या कसोटीसह कांगारुंचा अ‍ॅशेसवर कब्जा

8

सामना ऑनलाईन । पर्थ

ऑस्ट्रेलियाने पर्थ येथील तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि ४१ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेमध्ये ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पर्थ कसोटीमध्ये कांगारुंनी भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा दुसरा डाव २१८ धावांत गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज हेझलवूडने सर्वाधिक पाच बळी घेतले. पहिल्या डावात द्विशतक झळकावत ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभारून देणाऱ्या स्वीव्ह स्मिथला सामनाविराचा पुरस्कार देण्यात आला.

पर्थ कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिला डाव स्मिथ (२३९ धावा) आणि मिशेल मार्थ (१८१ धावा) या दोघांच्या शानदार फलंदाजीच्या धावांच्या जोरावर ९ बाद ६६२ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव ४०३ वर गुंडाळून ऑस्ट्रेलियाने २५९ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेत इंग्लंडला फॉलोऑन दिला होता. त्यानंतर चौथ्या दिवशी इंग्लंडची दुसऱ्या डावात ४ बाद १३२ अशी अवस्था केली होती.

पाचव्या दिवशी पावसामुळे खेळ उशिरा सुरू झाला. त्यानंतर पहिल्या डावातील शतकवीर डेव्हीड मलान (५४) आणि बेअरिस्टो (१४) यांनी काही काळ संघर्ष केला. मात्र हेझलवूडच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर इतर फलंदाजांनी नांगी टाकल्याने इंग्लंडचा दुसरा डाव २१८ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून जोश हझलवूडने ५, नॅथन लियॉन आणि कमिन्सने प्रत्येकी २ बळी घेतले तर, स्टार्कने १ बळी घेतला.

अॅशेस मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने १० विकेटने, तर दुसरा कसोटी सामना १२० धावांनी जिंकला होता. चौथा सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या