ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या वर्तणुकीत सुधारणा, प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची ग्वाही

मागील काही काळापासून ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली आहे. त्यामुळे हिंदुस्थानविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडू फारशी स्लेजिंग करणार नाहीत, अशी ग्वाही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी बुधवारी दिली.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अलीकडे फारसे स्लेजिंग करताना दिसत नाहीत. मैदानावर मर्यादित स्वरूपातच स्लेजिंग करायचे असे खेळाडूंना सांगण्यात आलेले आहे. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या एकदिवसीय मालिकेत अनेक स्टार क्रिकेटपटू खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन हा एक संयमी कर्णधार असून ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली तर क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम खेळाडू आहे. त्यामुळे स्टार खेळाडू नक्कीच एकमेकांचा सन्मान करतील, असा विश्वास लँगर यांनी व्यक्त केला.

कोहलीच्या स्लेजिंगकडे दुर्लक्ष करू!
‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहली एक आक्रमक खेळाडू आहे, मात्र त्याच्या स्लेजिंगकडे दुर्लक्ष करून आम्ही फलंदाजीने प्रत्युत्तर देऊ. प्रतिस्पर्धी खेळाडूंचाही सन्मान करायला हवा. समोरून स्लेजिंग होत असली तरी आम्ही शक्य तोपर्यंत आमचा मैदानावरील वावर हा नम्रपणेच असेल. लहान मुलांसारखे अधिक आक्रस्ताळेपणा करण्यात काहीच अर्थ नाही.’ – डेव्हिड वॉर्नर

आपली प्रतिक्रिया द्या