हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी कांगारूंना दुसरा झटका, कॅमरून ग्रीन कसोटी मालिकेला मुकणार

टीम इंडियाविरुद्ध नागपूर येथे होणाऱ्या क्रिकेट कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला दुसरा झटका बसला आहे. या संघातील वेगवान गोलंदाज आणि ऑलराऊंडर अशी ओळख असणारा कॅमरून ग्रीन या मालिकेला मुकणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने याबाबत दुजोरा दिला आहे.

पत्रकार परिषदेत स्मिथ म्हणाला की, ग्रीन याने नेटमध्ये फलंदाजीचा सराव केलेला नाही. त्यामुळे मला वाटत नाही की तो खेळू शकेल. त्याने नेट्समध्ये फलंदाजी केलेली नसल्याने तो खेळू शकणार नाही. पण अर्थात मी संपूर्णतः याबाबत सांगू शकत नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या फिट होण्याची वाट पाहू. पण सध्यातरी तो खेळू शकणार नाही, असा माझा अंदाज आहे, असं स्मिथ यावेळी म्हणाला. कॅमरून हा डिसेंबरमध्ये मेलबर्न कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्याला एनरिच नॉर्खियाने फेकलेला चेंडू लागला होता.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये 4 सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला दोन झटके बसले आहेत. ग्रीनपूर्वी वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड हा देखील या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.

या मालिकेसाठी संघ पुढीलप्रमाणे –

टीम इंडिया – रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, के. एस. भरत, ईशान किशन, आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया – पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, पीटर हँडस्कोम्ब, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेप्सन आणि डेव्हिड वॉर्नर.

ऑस्ट्रेलियाचा हिंदुस्थान दौरा 2023 –

• पहिली कसोटी – 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी (नागपूर)
• दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली)
• तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च (धरमशाला)
• चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)
• पहिली वनडे – 17 मार्च (मुंबई)
• दुसरी वनडे – 19 मार्च (विशाखापट्टणम)
• तिसरी वनडे – 22 मार्च (चेन्नई)