ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय

19

सिडनी – दक्षिण आफ्रिकेकडून घरच्या मैदानावर पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने शनिवारी पाकिस्तानचा सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर २२० धावांनी धुव्वा उडवत तीन सामन्यांची कसोटी मालिका ३-० अशा फरकाने खिशात घातली. या मालिका विजयामुळे यजमान कांगारूने मायदेशात झालेल्या सलग चार कसोटी मालिकांत पाकिस्तानवर निर्भेळ यश संपादन केले हे विशेष. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरची मॅन ऑफ दी मॅच म्हणून निवड करण्यात आली. तसेच दोन शतके व दोन अर्धशतकांसह ४४१ धावा फटकावणारा स्टीवन स्मिथ यावेळी मालिकावीर ठरला.

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या ४६५ धावांचा पाठलाग करणाऱया पाकिस्तानने चौथ्या दिवसअखेर एक बाद 55 धावा केल्या होत्या. शनिवारी अर्थातच कसोटीच्या पाचव्या दिवशी त्यांचा दुसरा डाव ८०.२ षटकांत २४४ धावांमध्येच आटोपला. पाकिस्तानकडून शर्जील खानने ४० धावा, मिसबाह उल हकने ३८ धावा, असाद शफीकने ३० धावा आणि सरफराज अहमदने नाबाद ७२ धावा फटकावल्या. पण एकालाही खेळपट्टीवर उभे राहून पाकिस्तानसाठी सामना वाचवता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूडने २९ धावा देत तीन व स्टीव ओ किफने ५३ धावा देत तीन फलंदाज गारद केले. नॅथन लायन व मिचेल स्टार्क यांनी अनुक्रमे दोन व एक फलंदाज बाद केला.

दरम्यान, पाकिस्तानला मायदेशात हरवण्याची करामत आमच्या संघाने केली. मात्र या मालिका विजयाने आकाशावरून चालण्याची गरज नाही. कारण आता आम्हाला हिंदुस्थानचा दौरा करावयाचा आहे. हिंदुस्थानी संघ सध्या कमालीची चांगली कामगिरी करतोय. शिवाय आयसीसी रँकिंगमध्येही ते अव्वल स्थानावर आहेत. आमच्या युवा खेळाडूंना तेथे खेळण्याचा अनुभवही यावेळी संपादन करता येणार आहे, असे उद्गार व्यक्त केले आहेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथ याने.

आकड्यांचा खेळ

ऑस्ट्रेलियाने १९९९सालापासून सलग चौथ्यांदा मायदेशात पाकिस्तानवर व्हाईटवॉश लादलाय.

पाकिस्तानला सलग सहा कसोटी सामन्यांमध्ये पराभवाची नामुष्की पत्करावी लागली आहे. त्यांच्यासाठी हाही एक विक्रमच.

या मालिकेत एकदाही गोलंदाजाला एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी गारद करता आले नाहीत. क्रिकेटच्या इतिहासातील ही दुसरीच खेप ठरलीय.

आपली प्रतिक्रिया द्या