‘गरुड माची’ सर करून टीम इंडिया बंगळुरूत

126

पुणे –  सलग १९ कसोटी अपराजित राहणाऱया टीम इंडियाला पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून ३३३ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. वर्मी लागलेल्या या पराभवाचा तणाव घालवण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली पश्चिमी ताम्हिणी घाटाचे ट्रेकिंग करीत ‘गरुड माची’ सर केली. निसर्गरम्य वातावरणात तिरंगा व भगवा फडकवत विराट सेनेने आपला तणाव आणि थकवा घालवला. या मोहिमेला मार्गदर्शन लाभले ते एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण व मिलिंद कीर्तने यांचे. या अफलातून गिरीभ्रमणानंतर ताजेतवाने झालेल्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱया कसोटी क्रिकेट लढतीसाठी बंगळुरूत दाखल झाली.

पराभवाच्या तणावातून व प्रदीर्घ कसोटी कार्यक्रमांच्या थकव्यातून हिंदुस्थानी क्रिकेट संघाला ‘फ्रेश’ करण्यासाठी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पुण्यातील आपल्या मित्रांच्या मदतीने संघाचे हे गिरीभ्रमण आयोजित केले होते. रात्रीचे ट्रेझर हॅट आणि दुसऱया दिवशी सकाळी ताम्हिणी घाटातील कॅरलबॅक माया म्हणजे ‘गरुड माची’ शिखर एक तासात पूर्ण करणाऱया टीम इंडियाने ट्रेकिंगचा आनंद लुटला. निसर्गाच्या मोकळय़ा प्रसन्न हवेत विराट सेनेने आपला थकवा व तणाव घालवून पुन्हा विजयाची ऊर्मी जागवली. ‘गरुड माची’वर  तिरंगा फडकवून टीम इंडियाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

टीम इंडियाच्या जर्सीवरून गायब होणारस्टार

कसोटी क्रिकेटमध्ये टॉपच्या स्थानावर असणाऱया टीम इंडियाच्या जर्सीवर ‘स्टार’ दिसणार नाही. आयसीसीने बीसीसीआयला एकाकी पाडल्यामुळे जागतिक क्रिकेट धोक्यात येऊ शकते अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत स्टार इंडियाने हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या जर्सी प्रायोजकत्वाचा करार पुढे सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ ते २०२३ या कालावधीसाठी हिंदुस्थानात होणाऱया क्रिकेट लढती व आयसीसी स्पर्धांचे प्रसारण हक्क ‘स्टार इंडिया’कडे आहेत. मात्र प्रशासनीय व आर्थिक क्षेत्रात हिंदुस्थानच्या बीसीसीआयचे वर्चस्व कमी होण्याची भीती आयसीसीच्या नव्या निर्णयामुळे संभवते असे ‘स्टार इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय शंकर यांनी सांगितले. बीसीसीआयचे महत्त्व कमी झाल्यास टीम इंडियाशी केले जाणार आर्थिक करार धोकादायक ठरू शकतील असेही मत शंकर यांनी व्यक्त केले. त्यामुळेच १ मार्चपासून टीम इंडियाच्या जर्सी प्रायोजकत्वाच्या कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय ‘स्टार इंडिया’ने घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या