पंत चमकले! धोनीला मागे टाकत रचला नवा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्यामध्ये हिंदुस्थानी संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याने त्याच्या नावे एक नवा विक्रम केला आहे.  कमी डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा गाठणाऱ्या हिंदुस्थानी यष्टीरक्षकांच्या यादीत त्याने पहिले स्थान मिळवले आहे.  हा विक्रम पूर्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. त्याने 32 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. पंतने हा टप्पा 28 डावांत पूर्ण केला आहे.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवट रोमहर्षक ठरणार आहे. ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी हिंदुस्थानला 2-1 अशा फरकाने मालिका जिंकण्यासाठी 328 धावांची आवश्यकता होती. बातमी प्रसिद्ध होईपर्यंत हिंदुस्थानी संघाने 3 गडी गमावत 194 धावांपर्यंत मजल मारली होती आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी 134 धावांची गरज होती.

shubhman-gill-duck-brisbane-test

आतापर्यंत या मालिकेत झालेल्या लढतींमध्ये दोन संघांमध्ये थरारक लढत पाहायला मिळाली आहे. सामना सुरू होण्यापूर्वी हिंदुस्थानी संघाचं या सामन्यात काही खरं नाही, ते हरणार! अशा एकतर्फी चर्चा ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या समर्थकांकडून आणि त्यांच्या काही माजी क्रिकेटपटूंकडून ऐकायला मिळत होत्या. मात्र हिंदुस्थानी संघाने जी जिद्दी कामगिरी केली, त्यामुळे हे सगळे टीकाकार खजील झाले आहेत.

cheteshwar-pujara-ducks-bowl-brisbane-test

पाचव्या दिवशी शुभमन गिलने चिवट खेळी करत 91 धावा केल्या. त्याचं कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावण्याचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाही. नाथन लॉयनने त्याला स्टीव्ह स्मिथकरवी बाद केलं. रोहित शर्मा 7 धावांवर बाद झाल्यानंतर गिल याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने किल्ला लढवला. गिल बाद झाल्यानंतर पुजाराने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या साथीने झुंज देणं सुरूच ठेवलं होतं. रहाणेने जलदगतीने धावा करायला सुरुवात केली होती, मात्र पॅट कमिन्सने त्याला बाद केलं. रहाणेने 22 चेंडूत 24 धावा फटकावल्या. त्यानंतर आलेल्या रिषभ पंत याने सावधपणे खेळत पुजाराला साथ दिली.

सिराजचा पदार्पणातच विक्रम

मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियातील पदार्पणातील मालिकेमध्ये विक्रम नोंदवला. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 13 फलंदाज बाद केले आहेत. याआधी ऑस्ट्रेलियामध्ये पहिलीच कसोटी मालिका खेळताना हिंदुस्थानकडून सर्वाधिक फलंदाज बाद करण्याची करामत जवागल श्रीनाथ याने केली होती. त्याने 1991-92 सालामध्ये 13 फलंदाज बाद केले होते. दत्तू फडकर यांनी 1947-48 साली 8 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

या कसोटीत हिंदुस्थान विजयी, ऑस्ट्रेलियाचा जय, ड्रॉ किंवा टाय यापैकी कोणताही निकाल लागू शकतो. ब्रिस्बेन कसोटीचा चौथा दिवस गाजवला तो युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर या दोघांनी. मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 73 धावांमध्येच पॅव्हेलियनमध्ये पाठवला. पहिल्या डावात धडाकेबाज अर्धशतक झळकावणाऱ्या शार्दूल ठाकूरने 61 धावांमध्ये चार फलंदाजांना बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांमध्ये आटोपला. हिंदुस्थानसमोर विजयासाठी 328 धावांचे आव्हान उभे ठाकले. टीम इंडियाने चौथ्या दिवसअखेरीस बिनबाद 4 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 4 धावांवर खेळत असून त्याच्यासोबत शुभमन गिल शून्यावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या