इंग्लंडच्या फलंदाजांची आज ‘कसोटी’; ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी

सामना ऑनलाईन । पर्थ

इंग्लंडला ४०३ धावांवर रोखणाऱया ऑस्ट्रेलियाने ऍशेस कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱया सामन्यात ९ बाद ६६२ धावसंख्येवर डाव घोषित करून पहिल्या डावात २५९ धावांची मोठी आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने दुसऱया डावात उर्वरित ३८.२ षटकांत ४ बाद १३२ धावसंख्येपर्यंत मजल मारली. इंग्लंडचा संघ अजूनही १२७ धावांनी पिछाडीवर असून त्यांचे ६ फलंदाज शिल्लक आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा डेव्हिड मालन २८, तर जॉनी बेअरस्टॉ १४ धावांवर खेळत होते.पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडच्या दुसऱया डावाची सुरुवात निराशाजनक झाली. जोश हेजलवूडने मार्क स्टोनमन (३) व ऑलिस्टर कुक (१४) यांना बाद करून ऑस्ट्रेलियाला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्याने स्टोनमनला यष्टीमागे पेनकरवी झेलबाद केले, तर कुकला स्वतःच झेल घेऊन इंग्लंडची २ बाद 29 अशी दुर्दशा केली. त्यानंतर फिरकीपटू नाथन लायनने कर्णधार जो रूटला (14) स्मिथकरवी झेलबाद करून इंग्लंडला तिसरा हादरा दिला.