गॅबा जिंकलो रे बाबा! मायदेशात ऑस्ट्रेलियाचे वस्त्रहरण, हिंदुस्थानचा अभूतपूर्व विजय

फोटो सौजन्य- BCCI twitter handle

ऑस्ट्रेलियाविरूद्धचा अंतिम कसोटी सामना हिंदुस्थानी संघाने जिंकत, यजमानांचे त्यांच्याच धरतीवर वस्त्रहरण केलं आहे. संघाला अवघ्या 3  धावा हव्या असताना शार्दूल ठाकूरची विकेट गेल्याने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या पोटात गोळा उठला होता. मात्र रिषभ पंतने सुंदर खेळी साकारतानाच आपल्या संघाचाच विजय होईल याची शेवटपर्यंत खेळत काळजी घेतली. या सामन्यासोबतच हिंदुस्तानी संघाने कसोटी मालिकाही 2-1 ने खिशात घातली आहे. तब्बल 32 वर्ष ऑस्ट्रेलिया गॅबाच्या मैदानावर अपराजित राहिली होती. त्यांच्या या अपराजित भूमीवरच त्यांना चारीमुंड्या चीत केल्याने हिंदुस्थानचा हा विजय खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल.

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवट रोमहर्षक ठरला. शेवटपर्यंत या सामन्यातला थरार जिवंत होता. आजच्या दिवसाच्या 20 षटकांचा खेळ उरलेला असताना हिंदुस्थानी संघाला विजयासाठी 100 धावांची गरज होती.  रिषभ पंतने या तणावाच्या परिस्थितीमध्ये डोकं शांत ठेवत, जिथे शक्य होईल तिथे मोठे फटके मारत पहिले अर्धशतक पूर्ण केलं आणि नंतर संघाला विजयही मिळवून दिला. पंत हा शेवटपर्यंत नाबाद राहिला. या ऐतिहासिक विजयानंतर रिषभ पंतच्या हाती तिरंगा देत संघाने संपूर्ण मैदानाला फेरी मारली. ऑस्ट्रेलियामध्ये हिंदुस्थानी संघाच्या क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर संघाला मिळालेलं मालिकेतील यश आणि सगळ्या क्रिकेटपटूंनी मैदानाला मारलेली फेरी ही लक्षणीय बाब ठरली.

संघामध्ये विराट कोहली, इशांत शर्मा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजासारखे अनुभवी क्रिकेटपटू नसतानाही संघाने मिळवलेला हा नवोदीत खेळाडूंसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात हिंदुस्थानी संघाची लाजिरवाणी अवस्था झाली होती. दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणेने खेळलेल्या शतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने मालिकेमध्ये पुनरागमन केलं होतं. तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता ज्यामुळे मालिका जिंकण्यासाठी चौथा सामना जिंकणं हे दोन्ही संघांसाठी आवश्यक होतं.

ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी हिंदुस्थानला 2-1 अशा फरकाने मालिका जिंकण्यासाठी 328 धावांची आवश्यकता होती. पाचव्या दिवशी शुभमन गिलने सुरेख फलंदाजी केली मात्र त्याला पहिलंवहिलं शतक काही पूर्ण करता आलं नाही. गिल याने 91 धावा केल्या. त्याच्या या धावांचं मोल संघाच्या विजयामध्ये फार मोठं आहे.

गिल याला नाथन लॉयनने त्याला स्टीव्ह स्मिथकरवी बाद केलं. रोहित शर्मा 7 धावांवर बाद झाल्यानंतर गिल याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने किल्ला लढवला. गिल बाद झाल्यानंतर पुजाराने कर्णधार अजिंक्य रहाणेच्या साथीने झुंज देणं सुरूच ठेवलं होतं. रहाणेने जलदगतीने धावा करायला सुरुवात केली होती, मात्र पॅट कमिन्सने त्याला बाद केलं. रहाणेने 22 चेंडूत 24 धावा फटकावल्या. त्यानंतर आलेल्या रिषभ पंत याने सावधपणे खेळत पुजाराला साथ दिली.

पुजारानेही अत्यंत चिवट खेळी करत 211 चेंडूत 56 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर रिषभ पंत याने मयांक अगरवाल, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूरच्यासोबत छोट्या-छोट्या भागीदाऱ्या रचत संघाची धावसंख्या वाढत राहील याची काळजी घेतली. एका टोकाला विकेट पडत असताना रिषभ पंत याने कमालीचा संयम राखत सामना जिंकेपर्यंत खेळपट्टीवर टीकून राहायचा निर्धार केला होता. शेवटचा विजयी फटकाही त्यानेच मारला

आपली प्रतिक्रिया द्या