Australian Open बेलारूसची अरिना सबलेंका ‘ऑस्ट्रेलिया ओपन’ची नवी राणी; पहिले ग्रँडस्लॅम जिंकत इतिहास रचला

बेलारूसची 24 वर्षीय महिला खेळाडू अरिना सबलेंका (Aryna Sabalenk) हिने वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याचा कारनामा केला आहे. टेनिस कारकिर्दीतील तिचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत तिने कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना (Elena Rybakina) हिचा अटीतटीच्या लढतीत पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.

मेलबर्नमधील रॉड लेव्हर एरिना महिला एकेरीचा अंतिम सामना खेळला गेला. विम्बल्डन विजेत्या एलेना रायबाकिना हिने पहिला सेट जिंकत दमदार सुरुवात केली. मात्र अरिना सबलेंका हिने जोरदार पुनरागमन करत दोन्ही सेट जिंकतून ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केले. अरिना सबलेंका हिने एलेना रायबाकिना हिचा 4-6, 6-3 आणि 6-4 असा पराभव केला.

दुसऱ्या स्थानावर झेप

दरम्यान, बेलारूसच्या अरिना सबलेंका हिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताच जागतिक क्रमवारीमध्ये मोठी झेप घेतली आहे. तिने थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ती पहिल्या दहामध्येही नव्हती.

टीमला दिले श्रेय

दरम्यान, पहिले ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर अरेना म्हणाली की, ‘मी अजून थरथरत आहे. मी खूप नर्व्हस आहे. माझी टीम, माझी वेडी टीम असे मी म्हणतो. आम्ही गेल्या वर्षभरापासून खूप चढ उतार पाहिले आहेत. आम्ही खूप कष्ट घेतले. त्यामुळे या ट्रॉफीचे खरे मानकरी तुम्ही आहात. माझ्यापेक्षा तुम्ही खूप महत्वाचे आहात.’