सेरेना, नदालची घोडदौड

55

मेलबर्न – स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालला ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत विजयासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. दुसरीकडे महिला एकेरीत अमेरिकेची ब्लॅक ब्युटी अर्थातच सेरेना विल्यम्स हिने लौकिकास साजेशा खेळ करत रूबाबात चौथ्या फेरीत धडक दिली.

२००९ मधील विजेता आणि जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या राफेल नदालला जर्मनीच्या अलेक्झांडर जेवेरेव याने विजयासाठी पाच सेटपर्यंत झुंजविले. शेवटी नदालने ही लढत ४-६, ६-३, ६-७ (५-७), ६-३, ६-२ अशी जिंकत चौथी फेरी गाठली. महिला एकेरीत २२ ग्रॅण्ड स्लॅम पदकांची राणी असलेल्या द्वितीय मानांकित सेरेना विल्यम्सने आपलीच देशभगिनी असलेल्या निकोल गिब्स हिचा ६-१, ६-३ असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवित आगेकूच केली. मात्र, सहाव्या मानांकित स्लोव्हाकियाच्या डोमिनिका सिबुलकोवाला तिसऱया फेरीतच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. तिसाव्या मानांकित रशियाच्या इक्टेरिना माकारोवा हिने डोमिनिकावर ६-३, ६-७ (३-७), ६-३ असा सनसनाटी विजय मिळविला.

सानिया, बोपण्णाची मिश्र दुहेरीत विजयी सलामी

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा हिने क्रोएशियाच्या इवान डोडिंगच्या साथीने तर रोहन बोपण्णाने कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोस्की हिच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत विजयी सलामी दिली. सानिया-इवान या द्वितीय मानांकित जोडीने जर्मनीची लॉरा सिगमंड आणि क्रोएटियाचा मॅट पेविच या अमेरिका ओपनमधील चॅम्पियन जोडीचा ७-५, ६-४ असा सरळसेटमध्ये पराभव करून आपल्या अभियानास प्रारंभ केला. दुसरीकडे बोपण्णा-डाब्रोस्की जोडीने स्लोवेनियाची कॅटरिना सरेबोक व न्यूझीलंडचा मायकल व्हिनस या जोडीवर ६-४, ६-७ (५-७), १-० (१०-७) असा विजय मिळवित दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

आपली प्रतिक्रिया द्या