ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेतेपदाचा चौकार;  इंग्लंड महिला संघावर 8 विकेटने मात

15

सामना ऑनलाईन । प्रॉव्हिडन्स

अंतिम सामन्यात इंग्लंड महिला संघाचा 8 विकेटस्नी पराभव करीत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने महिला टी-20 वर्ल्ड कपवर चौथ्यांदा नाव कोरलं आहे. गार्डनसच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंड संघाचा 8 विकेट राखून पराभव केला. गार्डनसने प्रथम गोलंदाजी करताना तीन फलंदाजांना बाद केले तर फलंदाजी करताना 33 धावांचे योगदान दिले.

यजमान विंडीजला पराभवाचा धक्का देत ऑस्ट्रेलियन महिला संघाने कॅरेबियन बेटांवर सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तर इंग्लंडने बलाढय़ हिंदुस्थानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे इंग्लंड महिला संघाचे फलंदाज अपयशी ठरले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकांत सर्व बाद 105 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन महिला संघाने 15.1 षटकांत 106 धावा करत अजिंक्यपद चौथ्यांदा आपल्या नावे केले.

अलिसा हेली ‘वुमन ऑफ सीरिज’

ऑस्ट्रेलियाकडून गार्डनसने सर्वाधिक 33 धावांचे योगदान दिले. याशिवाय अलिसा हेली (22 धावा) आणि मेग लेनिंग (28 धावा) यांनीही विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाने 15.1 षटकांत दोन विकेटस्च्या मोबदल्यात 106 धावा केल्या. गार्डनसला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर अलिसा हेलीला ‘वुमन ऑफ सीरिज’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या