ऑस्ट्रियात सात मशिदींना टाळे; ६० इमामांना हाकलणार

37
फाईल फोटो

सामना ऑनलाईन । व्हिएन्ना

देशात इस्लामिक राजकारण करून धार्मिक कट्टरता पसरवल्यामुळे आणि बेकायदा परदेशी निधी जमवल्यामुळे ऑस्ट्रियाच्या सरकारने सात मशिदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर ६० इमामांना त्या देशातून हाकलण्यात येणार आहे. ऑस्ट्रियाचे चान्सलर सैबेस्टियन कुर्ज यांनी या वृत्ताला दुजोरा देताना व्हिएन्नातील एक कट्टरवादी तुर्की मशीद आणि अरब धार्मिक संघटनांशी संबंधित आणखी सहा मशिदी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

धार्मिक संघटनांच्या प्राधिकरणाने केलेल्या तपासानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे कुर्ज यांनी सांगितले. पहिल्या महायुद्धादरम्यानची घटना दर्शवणारे एक नाटक व्हायरल झाले होते. त्यात महायुद्धात ठार झालेल्या तुर्की नागरिकांचा एक भाग होता. त्यात तुर्कीच्या झेंडय़ाला वंदन करत असताना काही विद्यार्थी दिसत आहेत. हा प्रकार म्हणजे देशात इस्लामिक राजकारण करून कट्टरतावाद पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे कुर्ज यांनी सांगितले. आमच्या देशात कट्टरतावादाला स्थान नसल्याचे स्पष्ट करत अशा घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कुर्ज यांनी निवडणुकांमध्ये देशातील कट्टरतावाद रोखण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांना सत्ता मिळाली आहे. त्यामुळे ते कठोरतेने कट्टरतावादाविरोधात कारवाई करत असल्याचे सांगण्यात आले.

६० इमामांची चौकशी

ऑस्ट्रियातील कोणतीही धार्मिक संघटना परदेशातून निधी घेऊ शकत नाही, असा कायदा ऑस्ट्रियात २०१५ मध्ये लागू करण्यात आला होता. या कायद्यानुसार परदेशी निधी घेणाऱया मशिदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुर्की इस्लामिक सांस्कृतिक संघटना (एटीआयबी) च्या ६० इमामांच्या परमीटची चौकशी सुरू असल्याचे ऑस्ट्रियाचे गृहमंत्री हर्बर्ट किकल यांनी सांगितले. त्यातील दोन परमीट रद्द करण्यात आली असून इतर पाच जणांना परमीट नाकारण्यात आल्याचे ते म्हणाले

ऑस्ट्रेलियाचे चान्सलर सैबेस्टियन कुर्ज आणि व्हाईस चालन्सलर हेन्झ ख्रिस्टियन स्ट्रेच यांनी पत्रकार परिषद घेऊन देशाची भूमिका स्पष्ट केली.

बुरख्यावरही बंदी?

शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱया विद्यार्थिनींना बुरख्याने चेहरा झाकण्यावरही ऑस्ट्रिया सरकारने बंदी घातली आहे. नॉर्वेच्या संसदेतही बुरख्याला बंदी घालण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून लवकरच त्याबाबतचा कायदा येणार आहे. तसेच जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, डेन्मार्क आणि इटली या देशांमध्ये बुरख्याला बंदी घालण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या