
लेखक, दिग्दर्शक, नाटककार, अभिनेते वनिर्माते अशोक समेळ सांगत आहेत, त्यांच्या महाकादंबरीच्या शब्द संचिताविषयी…
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आमचे जिवलग मित्र! दरवर्षी गणपतीत माशेलकर यांच्या घरी आम्ही काही मित्र एकत्र जमतो. तीन–चार वर्षांपूर्वी असाच मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या घरच्या गणपतीकडे टक लावून बघत बसलो असताना माझ्या अंतरात्म्याला एक शॉक बसल्यासारखा झाला. मलाच माझा आवाज ऐकू आला की, ‘‘अशोक, तू महाभारताचा शेवट लिहिलास, पण महाभारताची सुरुवात कुठे लिहिली आहेस? मुळात ज्याच्यामुळे महाभारत घडले, तो महाभारताचा महानायक म्हणजे भीष्म! भीष्म नसते तर महाभारत घडले नसते. त्यामुळे महाभारताची सुरुवात तुला लिहायलाच लागेल.’’ लगेच मी घरी जायला निघालो. त्या तीन तासांच्या प्रवासात मी ‘भीष्म’ डोक्यात साठवला. रात्री अकराच्या सुमारास मी घरी पोहोचताच, माझ्या अभ्यासाच्या कपाटातून माझी लेखणी व कागद काढले आणि माझ्या हातून कागदावर शब्द उमटले, ‘ते आभाळ भीष्माचं होतं.’ आता भीष्मांवरचे लेखन सुरू करायचे कसे? हा प्रश्न होता. कारण मी चरित्रपटाच्या दृष्टिकोनातून लिहायला गेलो, तर कदाचित चुकू शकेन असे वाटले. म्हणून मी थेट महाभारताचे युद्ध डोळय़ांसमोर ठेवले.
युद्धाचा नववा दिवस संपला आहे. भीष्म यांनी पांडवांचे प्रचंड सैन्य मारल्याने सगळी पांडवसेना हताश झाली आहे. इच्छामरणी असे भीष्म जे पांडवांचे पितामह आहेत, तेच पांडवांची सेना नष्ट करत सुटले आहेत. शेवटी यावर उपाय म्हणून सगळे पांडव श्रीकृष्णाकडे जातात. पांडव श्रीकृष्णाला सांगतात, ‘‘आम्हाला वाटत नाही की, अजून दोन दिवस तरी आम्ही युद्ध लढू शकू. कारण 180 वर्षांचे असे भीष्म पितामह आम्हाला ऐकत नाहीत. त्यातून ते इच्छामरणी आहेत. त्यांना मृत्यू येत नाही, तोपर्यंत आमचा विजय होऊ शकत नाही.’’ श्रीकृष्ण त्यांना सांगतो, ‘‘भीष्मांकडे जोपर्यंत तुम्ही पितामह म्हणून पाहत आहात, तोपर्यंत हा अर्जुनही काही करू शकणार नाही. भीष्म हे तर तुमच्याशी शत्रू म्हणूनच लढत आहेत. आता आपण भीष्मांनाच भेटून काय ते विचारू.’’
त्याच काळोखाच्या रात्री सर्व पांडव भीष्मांच्या शिबिराकडे निघतात. भीष्म त्या सर्वांचे स्वागत करतात. भीष्मांना धर्मराज म्हणतो, ‘‘पितामह, जोपर्यंत तुम्ही युद्धभूमीवर आहात, तोपर्यंत आम्ही जिंकू शकत नाही. त्यामुळे आम्हाला जिंकण्याचा मार्ग सांगा. कारण तुम्ही नेहमीच सत्याचा आग्रह धरत आलेला आहात.’’ भीष्म सगळय़ांकडे बघतात आणि त्यांना म्हणतात, ‘‘माझ्या मृत्यूचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. तुमच्या सेनेमध्ये एक महापराक्रमी असा एक वीर आहे आणि तो म्हणजे शिखंडी! उद्या शिखंडीला माझ्यासमोर उभा करा आणि अर्जुना तू बाण चालव.’’ हे ऐकून पांडव जायला निघतात तेव्हा भीष्म त्यांना ‘विजयी भव’ असा आशीर्वाद देतात.
दुसऱया दिवशी युद्ध सुरू होते. भीष्मांचा अग्निबाणांचा वर्षाव सुरू होतो. कुणीही त्यांच्या आसपास टिकावही धरू शकत नाही. संध्याकाळ होत आली तरी काही घडत नाही, हे पाहून भीष्म युधिष्ठराला सांगतात, ‘‘आपले काल काय ठरले होते? अर्जुनाला व शिखंडीला शोध आणि त्यांना माझ्यासमोर पाठव.’’ त्यानुसार काही वेळातच अर्जुन आणि शिखंडी भीष्मांच्या समोर उभे ठाकतात. शिखंडीला समोर उभा करून अर्जुन बाण मारतो तेव्हा भीष्म हात जोडून रथात बसलेले असतात. अर्जुनाच्या बाणाने भीष्म पडतात, पण रथातून पडता पडता भीष्मांचे लक्ष आकाशाकडे जाते. त्यांना अभिजित नक्षत्र घसरताना दिसते. सूर्य दक्षिणेकडे चालला आहे म्हणजे दक्षिणायन सुरू आहे, हे त्यांच्या लक्षात येते. ‘‘असे दक्षिणायन लागले असताना मी इच्छामरणी भीष्म मृत्यूला सामोरा का जाऊ? निदान चांगल्या मुहूर्तावर तरी मी मृत्यू पत्करेन,’’ असे ते स्वतःशी पुटपुटतात. ते सांगतात, ‘‘मी माझा प्राण आता देणार नाही. उत्तरायण लागेल तेव्हा मी मृत्यूचा स्वीकार करीन.’’
दक्षिणायन आणि उत्तरायण यामध्ये 58 दिवसांचे अंतर आहे. 58 दिवसांचे भीष्माचार्यांचे स्मरणकोष म्हणजेच ‘महाभारत’ आणि हाच तो माझ्या कादंबरीचा आत्मा! 58 वा दिवस उजाडतो. सगळे जण भीष्मांचा निरोप घेतात. सर्व विधी पार पडतात. त्यांचा आत्मा केव्हाच त्यांचे शरीर सोडून निघून गेलेला असतो. तो अष्टवसूंमध्ये जाऊन प्रभासला मिळतो. इथे मी लेखक म्हणून एक स्वातंत्र्य घेतले, ज्याला ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ असे म्हणता येईल आणि ती अशी की, हे सर्व झाले असताना श्रीकृष्णाच्या लक्षात येते की, अजून काहीतरी राहिले आहे. श्रीकृष्णाचा रथ मागे फिरतो आणि गंगेच्या किनारी येतो. तिथे आल्यानंतर श्रीकृष्णाला अद्भुत दृश्य दिसते. आकाशात भीष्मांच्या डोळय़ांत पाण्याचे थेंब साठले आहेत, तर खाली गंगा गोठली आहे. कारण तिचा पुत्र तिला सोडून गेलेला आहे. श्रीकृष्ण गंगेला स्पर्श करून तिला सांगतो, ‘‘अगं, किती वर्षे त्याला अजून ताटकळत ठेवणार आहेस? जाऊ दे त्याला.’’ तितक्यात भीष्मांच्या डोळय़ांतले दोन अश्रू गंगेच्या पात्रात पडतात आणि गंगा हळूहळू वाहू लागते. श्रीकृष्ण गंगेला म्हणतात, ‘‘हे द्वापारयुग तुझ्या पुत्राच्या नावानेच ओळखले जाईल.’’ अशा सर्व शब्द संचितातूनच ‘ते आभाळ भीष्मांचं होतं’ या माझ्या महाकादंबरीची लेखन प्रक्रिया घडत गेली.
शब्दांकन: राज चिंचणकर