यास्मिन शेख

159

राज्य शासनाचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ञ यास्मिन शेख यांना घोषित झाला. त्यांनी मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळण्यासाठी केवळ प्रयत्न केले नाहीत, तर आपले आयुष्यच मराठी अभिजाततेची कास धरण्यात खर्ची घातले. मराठी भाषा जेवढी सकस आणि दर्जेदार आहे, तेवढेच या भाषेचे व्याकरण महत्त्वाचे समजले जाते. यास्मिन शेख यांना प्रा. श्री. म. माटे म्हणजे माटे मास्तरांसारखे गुरू लाभले. त्यांच्या मार्गदर्शनातून यास्मिन शेख यांचा लेखनप्रवास पुढील काळात गतिमान होत गेला. बऱयाच मराठी माणसांना व्याकरणाविषयी तेवढी आत्मियता वाटत नाही, पण यास्मिन शेख यांनी आपले सारे आयुष्य मराठी भाषेतील व्याकरणासाठी खर्ची घातले. त्या अभ्यासातून त्यांनी व्याकरणातील सौंदर्यस्थळे शोधली. ही त्यांच्यातील शोधक वृत्ती, उत्साह वयाच्या नव्वदीतही कायम आहे आणि म्हणूनच त्यांच्यासारख्या अभ्यासकाचा केळकर पुरस्काराने गौरव होणे ही अधोरेखित करणारी बाब वाटते. भाषा साधी, सोपी, सुडौल कशी असावी, तिचा वापर कसा करावा, भाषेतील व्याकरण भाषेच्या आशयानुसार कसे नि कुठे वापरावे यासाठी गेल्या पाच-सहा दशकांपासून त्यांनी अभ्यास नि चिंतन केले. मराठी भाषेत अनेक भाषांमधील आलेल्या शब्दांचा त्यांनी साक्षेपाने अभ्यास केला. या विषयीचे विद्यार्थी आणि अभ्यासकांना मार्गदर्शन केले. या विषयाच्या संदर्भात मौलिक ग्रंथलेखन केले. त्यांच्या या निरंतर ध्यास आणि शोधक दृष्टीतून मराठी व्याकरणाचा अभ्यास खूप रंजक झाला आणि त्यामुळे अनेक भाषा अभ्यासकांना गोडी लागली. माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना मराठी व्याकरणाची गोडी लावली व या बाबीकडे बघण्याची व्यापक दृष्टी मिळवून दिली. या भाषा चिंतनातून ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘मराठी शब्दलेखन कोश’ या बहुमोल ग्रंथांची निर्मिती होऊ शकली. भाषा जास्तीत जास्त शुद्ध कशी असावी यासंदर्भात ‘मौज’चे संपादक श्री. पु. भागवत यांचेही मिळालेले मार्गदर्शन दिशादर्शक ठरले. म्हणूनच त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे महत्त्व मराठी भाषकांना निश्चित आहे.

प्रशांत गौतम

आपली प्रतिक्रिया द्या