राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

radhanagari-dam

कोल्हापूर जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी संततधार पावसाचा जोर काहीसा कमी झाला. धरणपाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टी ही कमी झाली असली तरी यंदाच्या वर्षी प्रथमच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले. पहाटेपासून आज दुपारपर्यंत एकुण तीन स्वयंचलित दरवाजे उघडले असून, यामधून ४ हजार ४५६ क्युसेक विसर्ग सुरू होता.

दरम्यान काल रात्री दहाच्या सुमारास ३९ फुटांची इशारा पातळी ओलांडलेल्या पंचगंगा नदीत तासाला इंचाने वाढ होत असून,नदीची वाटचाल ४३ फुटाच्या धोका पातळीकडे सुरू झाल्याने, संभाव्य पूरस्थितीचा फटका बसणाऱ्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येऊ लागले आहे.आतापर्यंत ७५ बंधारे पाण्याखाली गेले असुन,रस्त्यावर पाणी आल्याने ठिकठिकाणी रस्ते बंद होऊन,पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.सकाळी ७ च्या सुमारास पंचगंगेची पातळी ४० फुट होती. तर सायंकाळी चार च्या सुमारास ४०.१० इंच झाली होती.

जिल्ह्यात यापूर्वी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा इशारा पातळी ओलांडताना प्रशासनाकडून संभाव्य पूर स्थितीचा फटका बसणाऱ्या चिखली, ता.करवीरसह शहरातीलही पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरासाठी आवाहन करण्यात येत होते, त्यानुसार रात्रीपासूनच काहीजणांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली.

राधानगरी धरण आज पहाटे पाचच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे साडेपाच च्या सुमारास धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. ६ खुला झाला. त्यामधून १ हजार ४२८ आणि पॉवर हाऊसमधून १ हजार ६०० असा एकूण ३ हजार २८ क्युसेक विसर्ग सुरू होता. सकाळी ८.५५ वाजता स्वयंचलित दरवाजा क्रमांक ५ उघडला. तर दुपारी २.२० वाजता तिसऱ्या आणि ३.२० वाजता चौथ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला. पॉवर हाऊस मधील १ हजार ६०० आणि या चारही स्वयंचलित दरवाज्यांतून असा एकूण ७ हजार ३१२ क्युसेक विसर्ग सुरू होता.

दरम्यान काही धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने, धरणाच्या पाणीपातळीत घट होत असल्याने, अशा धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी त्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सकाळ पासून काही घट करण्यात आली. यामध्ये कासारी धरणातुन होत असलेल्या १ हजार ९० मध्ये ७३० क्यूसेक घट करण्यात आली. कुंभी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात ९०० वरुन ४०० क्यूसेक घट करत,५०० क्यूसेक विसर्ग करण्यात आला.

अलमट्टीतून टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ

गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार व अतिवृष्टीमुळे येथील नद्या नाल्यांना पूर आला आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातील धरणे भरून आता, ओसंडून वाहू लागली आहेत. परिणामी पंचगंगेसह नद्यांच्या पातळ्या इशारा पातळीवरून धोका पातळीकडे वाहू लागल्याने, महापुराचा धोका जाणवत असताना, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात उद्भवणाऱ्या महापुरासाठी जबाबदार धरण्यात येणाऱ्या कर्नाटकातील अलमट्टी धरणातून मात्र विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत असल्याने, या तिन्ही जिल्ह्यातील संभाव्य महापुराच्या भीषणतेवर तूर्त नियंत्रण मिळविण्यात जलसंपदा विभागाला यश आले आहे. अलमट्टी धरणात महाराष्ट्रातून जमा होणाऱ्या पाण्यापेक्षा अधिक विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दीड लाख क्युसेक विसर्ग सुरु असल्याने, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तसेच सांगली जिल्ह्याला पुरापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून त्यातून होणाऱ्या विसर्गामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. शिवाय कोयना धरणातून ही मोठ्या प्रमाणात निसर्गाची शक्यता असल्याने अलमट्टी धरणातून पूर नियंत्रणासाठी आज दुपारपासून विसर्गामध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. दुपारनंतर पावणे दोन लाख क्यसेक विसर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गगनबावडा तालुक्यात ९६.९ मिमी पाऊस

जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण ३२.५ मिमी तर सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ९६.९ मिमी पावसाची नोंद झाली.तर हातकणंगले-१२, शिरोळ-३.९, पन्हाळा-४८.९, शाहूवाडी-५६.२, राधानगरी-५४.२, करवीर-२६.४, कागल-१३.६, गडहिंग्लज-१३.९, भुदरगड-३५.६, आजरा-४४.५ आणि चंदगड तालुक्यात ५१.४ मिमी पावसाची नोंद झाली.

शिवाजी विद्यापीठाच्या आज व उद्याच्या परिक्षा स्थगित

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत शिवाजी विद्यापीठाच्या आज दि.१० व उद्या दि. ११ ऑगस्ट रोजीच्या आयोजित केलेल्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ यांच्या कडून सांगण्यात आले.