ट्यूबलेस टायर्सचे कोणते फायदे अथवा तोटे आहेत?

कुठल्याही वाहनाच्या सुरक्षिततेची सर्वात मोठी जबाबदारी त्याच्या ‘टायर’वर असते. अशावेळी सुयोग्य टायर निवडणे आवश्यक असते. त्यातल्या त्यात ट्यूब लेस टायर हे सामान्य टायर पेक्षा अधिक सुरक्षित समजले जातात. मात्र याचे जसे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. आज आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत.

ट्यूबलेस टायर्सचे फायदे –

  • वाहनातील अवजड घटक इंजिनकडून अधिक शक्तीची मागणी करतात आणि यामुळे अधिक इंधन वापरले जाते व वाहनाची इंधन कार्यक्षमता कमी होते. ट्यूबलेस टायरचे वजन कमी असते आणि त्यामुळे वाहनाचे un-sprung वजन कमी होते. ज्याचा परिणाम वाहनाच्या मायलेज वर होत असतो. त्यामुळे ट्यूबलेस टायर वापरून अधिक मायलेज मिळवणे शक्य होते.
  • ट्यूबलेस टायर वाहन गतिमान असताना कमी प्रतिरोध प्रदान करतात, त्यामुळे वाहन हलके वाटते आणि घर्षणही कमी होते. शिवाय घर्षणामुळे निर्माण होणारी उष्णता ही कमी असते व निर्माण होणारी कंपने सुद्धा कमी तीव्रतेची असतात.
  • ट्यूब असणाऱ्या टायर मध्ये बऱ्याच वेळा ट्यूब मधील हवेचा दाब कमी असेल तर टायर आणि चाकाची कडा (rim) यांमध्ये ट्यूब सापडून ट्यूब पंक्चर होते. ट्यूबलेस टायर मध्ये ट्यूबच नसल्याने ही समस्या उद्भवत नाही.
  • वरील मुद्द्यात नमूद केल्याप्रमाणे हवेचा दाब कमी असेल तर ट्यूब असलेले टायर पंक्चर होतात. त्यामुळे टायरमध्ये हवा कमी असेल तर वाहन चालवता येत नाही. याउलट ट्यूबलेस टायर हवेचा दाब कमी असेल तरीही कुठलीही समस्या निर्माण करत नाहीत, कारण पुन्हा तेच – ट्यूबची अनुपस्थिती.
  • ट्यूबलेस टायर मध्ये द्रवरूप सिलंट (liquid sealant) भरलेले असते. ज्यामुळे एखाद्या धारदार वस्तूंमुळे टायरला छिद्र जरी पडले तरीही छिद्रातून द्रवरूप सिलंट बाहेर पडते व तेथेच सुकते. त्यामुळे छिद्र आपोआप सील होते. त्यामुळे लांबच्या प्रवासाला जाताना ट्यूबलेस टायर पंक्चर जरी झाले, तरी ते दुरुस्त करून घेण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसते. ते स्वतःच दुरुस्त होतात.

ट्यूबलेस टायर्सचे तोटे –

  • ट्यूबलेस टायर्स रिमवर बसणे कठीण असते. ट्यूबलेस टायर रिमवर बसवण्यास जास्त वेळ लागतो. कारण तो रिमवर हवाबंद (airtight) स्थितीत व्यवस्थित बसणे आवश्यक असते. त्यासाठी तज्ञ व्यक्तीची आवश्यकता असते अन्यथा रिमचे नुकसान होऊ शकते.
  • एखाद्या परिस्थितीत ट्यूबलेस टायर पंक्चर होऊन सपाट झाले तर ते दुरुस्त करण्यासाठी विशिष्ट उपकरणे व तज्ञ व्यक्तीची आवश्यकता असते. ट्यूब असणारे टायर बदलण्याईतके ते सोपे नसते.
  • टायरच्या साईड वॉल (sidewall) वर पंक्चर असेल तर ट्यूबलेस टायर मध्ये मोठी समस्या उद्भवते कारण पूर्ण टायरच बदलावा लागतो. मात्र हेच जर ट्यूब असणाऱ्या टायरच्या बाबतीत घडले, तर फक्त ट्यूब बदलून काम होते. टायर बदलण्याची आवश्यकता नसते. ट्यूब बदलणे हे टायर बदलण्यापेक्षा कमी खर्चिक असते.
  • ट्यूबलेस टायरची किंमत ही सामान्य टायर पेक्षा अधिक असते.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना नेहा व्हसाळे यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या