‘कार’ला माजी कर्माचाऱ्याचे नाव देत केला सन्मान; टाटा मोटर्सच्या ‘या’ गाडीची विक्रमी विक्री

टाटा मोटर्सची एक अतिशय लोकप्रिय कार असलेल्या ‘टाटा सुमो’च्या नावाबद्दल लोक बहुधा असे विचार करतात की कदाचित या कारचे नाव त्याच्या आकारामुळे सुमो ठेवण्यात आले असेल. मात्र हे खरं नाही आहे. या कारचे नाव ठेवण्यामागे एक वेगळीच कहाणी आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.

टाटा मोटर्स जगातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. हिंदुस्थानात आणि जगभरात मोठ्या प्रमाणात लोक टाटा मोटर्सचे वाहन खरेदी करतात. यातलीच एक एसयूव्ही आहे ‘टाटा सुमो’. टाटा समूहाने टाटा मोटर्सचे माजी एमडी सुमंत मुळगावकर यांच्या नावावर या कारचे नाव ठेवले आहे. त्याच्या नावाच्या पहिल्या आणि दुसर्‍या अक्षराच्या सुरुवाती शब्दांना घेऊन सुमो असे नाव ठेवण्यात आले आहे. हे नाव टाटा मोटर्ससाठी खूप लकी ठरले. ही कार लॉन्च झाल्यापासूनच याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. ट्रॅव्हलस आणि मोठी गाडीची आवड असणाऱ्यांनी याला मोठी पसंती दिली. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा हे कर्मचार्‍यांचे हित लक्षात घेऊन कसे कार्य करतात याची ही एक खूण आहे.

टाटा मोटर्सने रिअर व्हील ड्राइव एसयूव्ही ‘टाटा सुमो’ 1994 मध्ये लॉन्च केली होती. या कारला 10 सीटर कार म्हणून लॉन्च करण्यात आले होते. तसेच याला सैनिकी वापर आणि ऑफ रोड ट्रान्सपोर्ट वाहतुकीच्या उद्देशाने कंपनीने लॉन्च केले होते. या एसयूव्हीच्या लॉन्चिंगनंतर याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. 1997 पासून एक लाखांहून अधिक सुमोची विक्री झाली आहे.

अशी झाली ‘टाटा मोटर्स’ची सुरुवात…

जेआरडी टाटा यांनी 1945 मध्ये टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी (टेल्को) ची स्थापना केली. याच कंपनीला आज आपण ‘टाटा मोटर्स’ या नावाने ओळखतो. 1954 मध्ये जर्मन कार निर्माता कंपनी ‘डेमलर बेंझ एजी’च्या सोबतीने टाटा मोटर्स वाहन निर्माण क्षेत्रात उतरली. 1998 मध्ये कंपनीने पहिली स्वदेशी कार ‘टाटा इंडिका’ बनवली. कंपनीने 1998 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये ‘टाटा इंडिका’ लॉन्च केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या