एका चार्जमध्ये गाठता येणार ‘मुंबई ते नागपूर’, Triton ने हिंदुस्थानात लॉन्च केली इलेक्ट्रिक कार…

देशात इलेक्ट्रिक कारची वाढती लोकप्रियता पाहून अमेरिकन वाहन उत्पादक कंपनी Triton ने हिंदुस्थानात आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च केली आहे. Model H असे या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे नाव असून हिंदुस्थानात लॉन्च होणारी ही कंपनीची पहिलीच कार आहे. हिंदुस्थानात उपल्बध असलेल्या एसयूव्हीपेक्षा ही कार दिसायला अत्यंत वेगळी आहे. Triton EV Model अमेरिकन एसयूव्हीसारखी दिसते, ज्यात चंकी फ्रंट फेस आणि मोठा ग्रिल देण्यात आला आहे.

या एसयूव्हीची लांबी 5,690 मिमी, उंची 2,057 मिमी आणि रुंदी 1,880 मिमी आहे. तसेच याचा व्हीलबेस जवळपास 3,302 मिमी इतका आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीमध्ये आठ लोक सहज बसू शकतात. यात 5,663 लीटर (200 क्यूबिक फूट) सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे, असा दावा कंपनीने केला आहे. ही एसयूव्ही बाजारात सात रंग पर्यायसह उपलब्ध होणार आहे.

Triton Model H मध्ये 200kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ज्यात हायपरचार्जचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, हायपरचार्जद्वारे ही एसयूव्ही 2 तासात पूर्ण चार्ज होते. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही कार 1,200 किमीपर्यंत धावू शकते. कंपनीने म्हटले आहे की, ही कार लॉन्च करण्यापूर्वीच कंपनीला हिंदुस्थानातून 2.4 बिलियन डॉलर्सची ऑर्डर मिळाली आहे. 1,000 किमीची रेंज असलेली ही हिंदुस्थानातील पहिलीच इलेक्ट्रिक कार असेल.

आपली प्रतिक्रिया द्या