चिरंतन आत्मशोध

36

अनंत सुमंत

स्वतःतून उगवताना’ हा रेखा बैजल यांचा काव्यसंग्रह वाचताना त्यांच्या कल्पनाविश्वाची अथांगता आणि प्रगल्भता शब्दाशब्दातून जाणवत राहाते. शब्दांची पारदर्शकता, नितळता, वैचारिक समृद्धतेसह व्यक्त होताना जाणवत राहाते. देह, मन, बुद्धी, आत्मा या स्तरांवर शिवाय स्त्री, पुरुष, समाज, भोवताल या संदर्भात द्वैत, अद्वैत अनुभवताना मनाच्या आसावर फिरत राहणाऱ्या जाणिवांना भोवऱ्यासारखं आभासी स्थैर्य आणि भावनांचं द्वंद्व कवयित्रीला सतत जाणवत राहातं. हा काव्यसंग्रह म्हणजे स्वतःच शोधलेल्या उत्तरांमधून केलेला आत्मशोध आहे. हे आत्मचिंतन एका व्यक्तिमत्त्वाची चिरंतनत्वाच्या दिशेने केलेली वाटचाल आहे. प्रत्येक विचार जगण्यातून विस्तारित होण्याचा, मुक्त होण्याचा विचार आहे.

हे कवयित्रीचे स्वतःहून उगवणे आहे. स्वतःहून उगवताना या कवितेत कवयित्री म्हणते-
‘‘दगडापेक्षा वीट मऊ म्हणता म्हणता
आयुष्य विटांचंच बांधलं गेलं’’
निसर्गाची ओढ अनेक कवितांमधून व्यक्त होते. पण ही ओढ केवळ निसर्गरम्य या अर्थाची नाही, तर त्याहून पलीकडची परमेश्वरीय चैतन्याची निसर्गकल्पना आहे. ही चैतन्यशक्तीच आपल्या अस्तित्वाला कारण आहे ही जाणीव त्यात आहे. ‘मूठभर ऊन अंगाला लेपताना आणि पसाभर चांदण्यांना डोळे आंदण देताना आपण अजर अमर अनंत आकाश होवो.’ ही ती जाणीव आणि म्हणूनच समाजातलं आपलं ‘बाईपण’ (स्त्रीपण नव्हे) तिला जाचक वाटतं.

मी आणि स्त्रीत्व या कवितेत-
‘‘मी कधी कधी शमीच्या हवाली करते माझं स्त्रीत्व
आणि निघते एका अज्ञातवासी प्रवासासाठी…’’
किंवा शोध या कवितेत-
‘‘स्त्रीत्वाची कवचकुंडले धिःकारती मज शापुनी
कर्णसम मी तळमळते कवचास त्यागण्यासाठी
या मनी रुजल्या पारंब्या समूळ कशा उपटू मी
मग येऊन मी भिरभिरते या स्त्री शरीराच्या काठी…’’
समपर्ण आणि त्यागातून रिक्त झालेल्या स्त्रीला सर्वस्वाची आहुती द्यावी लागणं चटका लावणारं आहे.
संग्रहातल्या काही कविता गूढत्वाकडे जाणाऱ्या आहेत.
कवयित्रीचं विदेहीपण, संन्यस्तपण अनेक कवितांतून डोकावतं, पण वीरक्त अवस्थेतच तिच्या वृत्तीना बहर येतो. आत्मपालवींचा असा विरोधाभास त्यात आहे.

कवितांचा आणखी एक विशेष म्हणजे समर्थ प्रतिमा. काही प्रतिमातून फार मोठा आशय व्यक्त होतो. या प्रतिमा प्राचीन पुराणातल्या आहेत तशाच वैज्ञानिक संकल्पना किंवा वैद्यकीय परिभाषेतल्या आहेत. प्राचीन आणि वाङ्मयातल्या द्रौपदी, कौरवी हट्ट, कांचन मृगाचं कातडं मागण्यातलं सीतेचं अमानुषपण, शमीच्या हवाली स्त्रीत्व करणं आणि आत्मशोधाला निघणं या सर्व प्रतिमा आजच्या सत्याला रिलेट करतात.
किंवा ‘‘एकेक दिवस ऍबॉर्ट होत जातो…’’
‘‘अनेक स्वप्नांचं जीवाश्म भूतकाळातल्या स्तरात
घट्ट रुतून बसलेले’’ – ‘‘आयुष्य रिवाइंड करत परत नेणं’’
‘‘…मनात भगवा पलाश उगवून येणं…’’
अशा वेगवेगळय़ा समर्थ प्रतिमांमधून थोडक्या शब्दात अर्थसंपन्न होत जातो. काही कवितांमधून ग्रामीण जीवनही व्यक्त होतं.
‘‘माहेरी आलेली सासुरवाशीण सासरी जाताना
अंगणातल्या लिंबाच्या झाडावर आपलं हसू बांधून ठेवते…
‘‘सांडगे तोडता तोडता लेकीच्या आठवणीनं
आईच्या काळजाचे धागे तुटत जातात’’
अशा शब्दात कष्टकरी दुःख व्यक्त होतात. दुःख, स्वप्नभंग व्यक्त करणं असूनही एक सहनशील आशावाद अनेक कवितांमध्ये दिसतो. अंतर्यामी एक स्थीर दीपस्तंभ असावा. असा संन्यास या कवितेतही तो आशावाद व्यक्त होतो.

‘उभं राहावं स्वयंभू…
आपलीच एकमेव सावली सोबत घेऊन
आपण प्रकाशमान होत चालत राहावं सूर्य गामिनी होत’
अशा शब्दात अंतस्थ स्वचं सामर्थ्य कवितांतून व्यक्त होत जातं.
विचार आणि तरल संवेदनशीलपणा याचं अद्भुत मिश्रण या कवितांमध्ये आहे. त्या स्वत्त्व ओलांडून मोठय़ा कक्षांकडे जातात बुद्धाच्या तत्त्वांची आठवण येऊन या साऱ्या कविता पुनः पुन्हा वाचाव्या, अभ्यासाव्या चिंतन करावं वाटणाऱ्या अशा आहेत. या प्रादेशिक भाषेत मर्यादित राहू नयेत. अनेक भाषांमध्ये त्या अनुवादित व्हाव्यात…हा काव्यसंग्रह साहित्य अकादमी – नॅशनल बुक ट्रस्ट अशा ठिकाणांपर्यंत जाऊन अभ्यासकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे मनःपूर्वक वाटते.

स्वतःतून उगवताना
कवयित्री – रेखा बैजल
प्रकाशक जनशक्ती वाचक चळवळ, संभाजीनगर
पृष्ठ- १०२, किंमत – १०० रुपये

आपली प्रतिक्रिया द्या