अवनीची गगनभरारी

49

सामना प्रतिनिधी

हिंदुस्थानच्या हवाई दलातील लढाऊ विमान उडवणाऱ्या अवनी या पहिल्या महिला ठरल्या असून तिच्या या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

अवनीने गुजरातच्या जामनगर येथून आपलं प्रशिक्षण नुकतंच पूर्ण करून १८ फेब्रुवारी रोजी ‘मिग २१’ या फायटर प्लेनसह आकाशात यशस्वी झेप घेतली. यापूर्वी अवनी महिला फायटर प्लेन चालवत असे. मात्र त्या वेळी तिच्या मदतीला पुरुष कर्मचारीही असायचा. पण मिग २१ हे विमान तिने एकटीने चालवल्याने तिच्या नावावर नव्या इतिहासाची नोंद झाली आहे. ही लढाऊ विमाने उडविण्यासाठी तीन महिलांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यामध्ये अवनीबरोबर भावना कांत आणि मोहना सिंह होत्या. मध्य प्रदेशच्या शहडोलची या छोटय़ाशा गावात अवनीचा जन्म २७ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला. तिने प्राथमिक शिक्षण आपल्या गावीच पूर्ण केलं. यानंतर राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठातून बीटेकपर्यंतचं शिक्षण घेतलं. २०१६ मध्ये हिंदुस्थानी वायु दलात ज्या तीन महिला वैमानिकांचा समावेश झाला त्यात अवनी एक होती. कल्पना चावलाला ती आदर्श मानते.

विमान उडवणं हे मोठया जिकरीचं काम… त्यातच लढाऊ विमान उडवणं तर जोखमीची बाब… आतापर्यंत लढाऊ विमानं चालविण्यामध्ये पुरुषांची मक्तेदारी होती, पण या क्षेत्रात आता महिलांनीही बाजी मारली आहे. ताजं उदाहरण म्हणजे वायु दलातील फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी… या महिला वैमानिकेने नुकतंच ‘फायटर एअरक्राफ्ट मिग २१ बिसन’ विमान उडवून कमालच केलीय. तिने आपलं नाव इतिहासात कोरलंय. हिंदुस्थानच्या हवाई दलातील लढाऊ विमान उडवणाऱ्या अवनी या पहिल्या महिला ठरल्या असून तिच्या या धाडसाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

चिकाटी आणि धैर्य…

मिग – २१ विमान हवेत उडवण्याचं प्राथमिक प्रशिक्षण दिल्यानंतर हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं. त्यानंतरच्या टप्प्यात चंद्रप्रकाशात आणि गडद काळोखातही विमान चालवण्याचं प्रशिक्षण वैमानिकांना देण्यात येतं. हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असतं. पण अवनीने खडतर प्रशिक्षण, चिकाटी आणि धैर्य ठेवत आकाशात यशस्वी झेप घेतली. अवनीने आतापर्यंत पायलट्स पीसी-७, टर्बोप्रॉप्स, किरण आणि हॉक जेट ट्रेनर्स अशी तुलनेनं हाताळायला सोपी विमानं चालवली आहेत.

काय आहे मिग-२१ बिसन

मिग २१ हे सुपर सॉनिक लढाऊ विमान आहे. ‘मिग-२१ बिसन’ या विमानाचं टेक-ऑफ आणि लँडिंग स्पीड सर्वाधिक असतं. आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगानं उड्डाण करणारं हे लढाऊ विमान आहे. जमिनीवरून हवेत उड्डाण करताना ताशी तब्बल ३४० किलोमीटर आणि हवेतून जमिनीवर झेपावताना वेग ताशी तब्बल ३४० किलोमीटर असतो. त्यामुळे मिगचं नियंत्रण करणं कठीण आणि कौशल्याचे काम असतं. अवनीने ते करून दाखवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या