फाईव्ह स्टार हॉटेलपासून दूर राहा…मोदींची मंत्र्यांना ताकीद

17

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सरकारी दौऱ्यादरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलपासून दूर राहा, सरकारी सोयींचाच वापर करा अशी सक्त ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मोदी यांनी मंत्र्यांना या सुचना दिल्या.

मंत्री सरकारी दौऱ्यादरम्यान सार्वजनिक क्षेत्राच्या सोयीसुविधांचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी मोदींना मिळाल्या होत्या. यामुळे नाराज झालेल्या मोदींनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांची झाडाझडती घेतली. सरकारी दौऱ्यादरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य करण्याच्या सवयींपासून दूर राहा, असे मोदींनी यावेळी मंत्र्यांना सांगितले. तसेच काही मंत्री निमशासकीय गाड्यांचा वापर खासगी कामांसाठी करत असल्याची तक्रार आपल्याकडे आल्याचे यावेळी त्यांनी मंत्र्यांना सांगितले. ही थेरं यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत, असा सज्जड दमच मोदींनी यावेळी उपस्थित मंत्र्यांना दिला.

भ्रष्टाचारविरोधात झिरो टॉलरन्स धोरणाबाबत कुठलीही तडजोड करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी मंत्र्यांना बजावून सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकींना अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. यादरम्यान पक्षाच्या प्रतिमेला तडा जाईल, अशी कुठलीही घटना घडता कामा नये असे मोदींना वाटते. यामुळेच मंत्र्याना ते वारंवार सावध राहण्याच्या सूचना देत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या