कोलकत्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येमुळे देशभरातील डॉक्टरांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा निषधे करत आणि सुरक्षेच्या कारणावरून देशातील अनेक वैद्यकीय संस्थांमध्ये डॉक्टर संपावर गेले आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत कायदा करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, आसामच्या सिलचर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (SMCH) च्या अधिकाऱ्यांनी एक नवा आदेश जारी केला आहे. मात्र या आदेशावरून वादाला तोंड फुटले आहे.
सिलचर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील सर्व महिला डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना मध्यरात्री बाहेर फिरणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ‘महिला डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक असल्याशिवाय रात्रीच्या वेळी वसतिगृह किंवा निवासाच्या खोलीतून बाहेर जाणे टाळा. तसेच आपल्या सुरक्षिततेची देखील काळजी घ्या’, अशी सूचना एसएमसीएच संस्थेचे प्राचार्य आणि मुख्याध्यापक डॉ. भास्कर गुप्ता यांनी केली आहे.
दरम्यान, वसतिगृहातील सर्व रहिवाशांनी संस्थेने केलेले नियम आणि प्रशासकीय नियमांचे पालन करावे. तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करता येईल, असे साधन आपल्याकडे कायम असावे. तसेच तुम्ही कर्तव्यवर असताना सभोवतालच्या वातावरणाबाबत सतर्क राहा आणि लोकांशी नम्रपणे वागा. तसेच कोणतीही समस्या किंवा तक्रार असेल तर ती ताबडतोब अध्यक्षांना कळवा, असे काही महत्त्वाचे मुद्दे त्या मांडण्यात आले आहे.
कॉलेजच्या आदेशावर विद्यार्थ्यांचा आक्रोष-
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जारी केलेल्या आदेशांवर मात्र विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला खोल्यांमध्येच राहायला सांगण्यऐवजी विद्यार्थ्यांची आणि इतर महिला वर्गाच्या सुरक्षेत सुधारणा करावी, असे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. तसेच एसएमसीएचच्या जुनियर डॉक्टर्स असोसिएशनने (जेडीएस) देखील या सल्ल्याचा निषेध केला आहे. आम्ही SMCH कॅम्पसमधील सुरक्षेच्या समस्यांवर बऱ्याचदा बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याकडे कधीही लक्ष दिले गेले नाही. सुरक्षा व्यवस्था सुधारण्याची विनंती आम्ही अधिकाऱ्यांना करतोय, असे मत जुनियर डॉक्टर्सनी मांडले आहे.