आमदार नीलम गोऱ्हे यांना पुरस्कार

67

सामना प्रतिनिधी । नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे स्वर्गीय माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्षम आमदार पुरस्काराने शिवसेनेच्या उपनेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांना उद्या शुक्रवारी, २१ एप्रिल रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर येथे शुक्रवारी, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. पन्नास हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या सोहळ्याप्रसंगी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महापौर रंजना भानसी, वनाधिपती विनायकदादा पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘सावाना’चे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांनी दिली.

वाचनालयातर्फे दरवर्षी ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी नेते स्वर्गीय माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्षम आमदार पुरस्कार दिला जातो. डॉ. शोभा नेर्लीकर आणि डॉ. विनायक नेर्लीकर यांनी वाचनालयाला दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार सन २००३ पासून देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत बी. टी. देशमुख, गणपतराव देशमुख, आर. आर. पाटील, प्रमोद नवलकर, शोभा फडणवीस, जीवा पांडू गावीत, दत्ताजी नलावडे, गिरीष बापट, सा. रे. पाटील, पांडुरंग फुंडकर, जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, बच्चू कडू यांना सन्मानित करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या