सहल दुर्घटनांचा बोध

>>सुनील कुवरे<<

सागरी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी मालवणच्या वायरी समुद्रात उतरलेल्या बेळगावच्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या सात विद्यार्थी आणि एका प्राध्यापकाला अतिउत्साहामुळे जीव गमावावे लागले. सहली काढण्यात काही वावगे नाही. मात्र आपल्या जीवाला सांभाळून हे छंद जोपासले पाहिजेत. पण सागरी किनारी वारंवार दुःखद घटना घडत असतात. त्यातून जे शहाणपण घ्यायचे आणि ज्या सुधारणा करायच्या त्या होत नाहीत. तसेच अशा प्रकारची सहल आयोजित करताना जे काटेकोर नियोजन लागते त्याचा अनेक ठिकाणी अभाव असतो. गेल्या वर्षी रायगड येथील मुरुडच्या समुद्रात पुण्यातील अबिदा महाविद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. आता मालवणच्या वायरी समुद्रात घडलेली दुसरी मोठी दुर्घटना आहे. असाच प्रकार २-३ वर्षांपूर्वी मनाली येथे नदीच्या वेगवान पात्रात सुमारे २०-२२ विद्यार्थी बुडाले होते. कोकणातील समुद्रकिनारा पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. किनाऱयावर उभे राहून अथांग समुद्राचे दर्शन घेणे सहज शक्य असते. पण अनेक पर्यटक समुद्रात पोहायला जातात. त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही. लाटांची ताकद काय असते याचा अंदाज त्यानां नसतो. त्या लाटेचा सामना करेपर्यंत पायाखालची वाळू सरकून जाते. त्यामुळे समुद्रात पर्यटकांच्या अपघातांची संख्या वाढत आहे.

कोकणातील समुद्रकिनारी पोहणे धोकादायक आहे. त्या ठिकाणी दुर्घटना सातत्याने घडत असतात. तरीदेखील खोल पाण्यात पोहायला जाण्याचा वेडेपणा सुरूच आहे. स्थानिक लोक पर्यटकांना खोल पोहायला जाऊ नका, असे सांगतात. फलकावर तसा इशाराही लिहिलेला असतो. पण पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक पोहायला जातात आणि अनर्थ ओढवून घेतात. मुरुडची घटना घडल्यावर नंतर राज्य सरकारने शैक्षणिक सहली कोणत्या ठिकाणी न्याव्यात व कोठे नेऊ नयेत याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्याचीसुद्धा अंमलबजावणी झाली नाही. काही ठिकाणी प्रशिक्षित जीवरक्षक नेमले आहेत. तर काही ठिकाणी प्रशिक्षित जीवरक्षक नेमले नाहीत. पर्यटकांनीही स्वतःची सुरक्षा स्वतः केली पाहिजे. समुद्रकिनारी वारंवार घडणाऱ्या या घटना चिंताजनक आहेतच शिवाय संवेदनाशून्यतेचा परिणाम दाखविणाऱया आहेत.