प्लॅस्टिक : असून अडचण नसून खोळंबा

137

<<लोकेश बापट – [email protected]>>

प्लॅस्टिक असून अडचण नसेल तर खोळंबा अशा एका विचित्र परिस्थितीत मानवजात अडकून गेली आहे. एकंदरीत सर्व परिस्थितीचा आजवर अंदाज घेतला तर मानव प्लॅस्टिक यामधील हा विक्रम-वेताळाचा खेळ कायमच अनुत्तरित राहणार आहे असे दिसते. आज जगभरामधील संपूर्ण मानवजात फक्त आणि फक्त प्लॅस्टिकच्याच जगात राहात आहे असे विधान केले तर हे खोडून काढणे अवघड आहे. नीट विचार करून पाहिले तर लक्षात येईल आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण प्लॅस्टिक वस्तूंच्या वा घटकांच्या बंधनात अडकून पडलो आहोत.

सकाळी उठल्यावर आपण दात घासतो तो ब्रश प्लॅस्टिकचा. ज्या पेस्टने दात घासतो त्या पेस्टचे आवरण प्लॅस्टिकचे. सकाळी दूध आणतो ते प्लॅस्टिकच्या पिशवीतील. आंघोळीकरता वापरतो प्लॅस्टिकची बादली व मग, साबणाची केस प्लॅस्टिक, ऑफिसमध्ये कॉम्प्युटर, माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, पेन ड्राइव्ह, प्रिंटर, लिखाणाचा पेन, सेल फोन, सीडी, डीव्हीडी, जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल, शीतपेय, अन्नपदार्थांचे पॅकिंग, चष्मे, गॉगल, अनेक प्रकारचे होम अप्लायन्सेस, मेडिकल इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, ऑटोमोबाईल्सचे पार्टस् वगैरे असे शेकडो प्रकारच्या प्लॅस्टिक स्वरूपामधील घटकांची हाताळणी आपण रोज करीत असतो.

वरील वस्तूंची यादी पाहता समजू शकेल की अनेक प्रकारच्या प्लॅस्टिकला आज तरी कोणताही ठोस पर्याय उपलब्ध नाही. यामुळे प्लॅस्टिकमुक्त म्हणण्याऐवजी या प्लॅस्टिकचे योग्य व्यवस्थापन कशाप्रकारे करता येईल याचा विचार केला गेला पाहिजे.

आज आपण पाहतो की लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत प्लॅस्टिकचा अगदी मुक्तहस्ताने वापर सतत होत असतो. मग हा एवढा अतिरेकी वापर का वाढला याचे कारण शोधून काढणे गरजेचे आहे.

यामधील काही प्रमुख कारणं म्हणजे : 1) प्लॅस्टिक बनविण्यास सोपे आहे, 2) अत्यंत रास्त दरात उपलब्ध, 3) दीर्घकाळ टिकण्याची क्षमता, 4) गंज चढत नाही, 5) पाणी विरोधक, 6) हाताळण्यास सोप, 7) दणकट व टिकाऊपणा, 8) थर्मल व इलेक्ट्रिकल इन्सुलेशन प्रॉपर्टी जास्त, 9) आपली बदललेली जीवनशैली. मुळात प्लॅस्टिक म्हणजे काय? मुख्य घटक कार्बन व नाफ्ता तसेच इतर रासायनिक घटक म्हणजे बेन्झीन, झायलीन, स्टेरीन, डॉक्सीन, इथेनिल ऑक्साइड, व्हिनाईल क्लोराइड, अँटिमनी ऑक्साइड, कार्बन टेट्रा क्लोराइड, हेक्झीन, सायक्लो हेक्झीन, क्रोमियम ऑक्साइड वगैरे यांचा वापर करून प्लॅस्टिकची निर्मिती होते. हीच रासायनिक संयुगे आज आपल्या पर्यावरणास, मानव, पशुपक्षी, जलचर यांच्यावर घातक परिणाम करीत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास करीत आहेत.

जेव्हा प्लॅस्टिक स्वरूपातील कचरा जमिनीवर, शेतात, पाण्यात, सार्वजनिक ठिकाणी, जंगलात टाकला जातो किंवा साठून राहातो. हे प्लॅस्टिक उष्णतेच्या संपर्कात येते. ही उष्णता सूर्याची अल्ट्रा व्हायलेट किरणांची, जमिनीवरची, वातावरणामधील असते. प्लॅस्टिक या उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे त्यातून डॉक्सीन नावाचा विषारी वायू बाहेर पडतो. हा कोणत्याही प्रकारच्या उष्णतेने सर्वात जलद गतीने वातावरणात बाहेर पडणारा वायू आहे. इतरही रसायने वातावरणात पसरून आजूबाजूची हवा प्रदूषित करत असतात. जेव्हा प्लॅस्टिक उघडय़ावर जाळले जाते तेव्हा ही रसायने ६ ते ७ कि.मी.पर्यंत पसरू शकतात. दशसनामार्फत हाच वायू आपण शरीरात घेत असतो. यांच्या संपर्कात राहिल्यामुळे आपणास दमा, रक्तदाब, हृदयाचे आजार, मूत्राशयाचे, किडनीचे विकार, नपुंसकत्व यासारख्या आजारांचा धोका उद्भवू शकतो. संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की याच प्रकारचे आजार पशुपक्ष्यांना होत आहेत. जमिनीवरील प्लॅस्टिक कचरा उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे त्या जमिनीचा पोत खालावतो. काही वर्षांनी ती नापिक होते. नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये प्लॅस्टिक कचरा साठून राहिल्यामुळे झरे, नदी, तलाव, विहिरी, समुद्र यांतील पाणी विषारी होत आहे. फेकून दिलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांमधील अन्न खाताना त्या पिशव्या पोटात जाऊन अनेक ठिकाणी गाई, गुरे दगावल्याची अनेक उदाहरणे आपण पाहात असतो.

बाटलीचे झाकण, बाटलीचा तळ व उभे जॉइंटस् याला बिसफिनाईल ए (बीपीए) याचे कोटिंग केलेले असते. बीपीए हे एक घातक असे रसायन असून याच्या वापरामुळे प्लॅस्टिक पारदर्शक, मजबूत, टिकाऊ आणि दिर्घायु होते. या बाटल्या, कॅन जेव्हा उष्णतेच्या संपर्कात येतात तेव्हा काही प्रमाणात बीपीएचा अंश पाण्यात शोषला जातो. दर तासाला खोलीबंद वातावरणात ०.०८ ते ०.१२ नॅनोग्रॅम बीपीएची मात्रा पाण्यात उतरत असते. जेव्हा प्रखर उष्णतेच्या संपर्कात येतात तेव्हा याचे प्रमाण ०.१८ ते ०.३२ नॅनोग्रॅम एवढे असते. हा आकडा जरी दिसायला अगदीच नगण्य असला तरी आज आपण दैनंदिन जीवनात वर्षानुवर्षे प्लॅस्टिक बाटल्यांमधूनच पाण्याचे सेवन करत आहोत व हे रासायनिक घातक द्रव्ये शरीरात साठवत आहोत ही शक्यता नाकारता येत नाही हे लक्षात घेणे जरुरीचे आहे.

अनेकदा आपण हॉटेल, ढाबे-रेस्टॉरंटमधून फूड पार्सल घरी आणतो यामध्ये गरम अन्नपदार्थ देण्यासाठी प्लॅस्टिक बॅग्ज किंवा प्लॅस्टिकचे डबे वापरले जातात. तसेच चहा, कॉफीसाठी प्लॅस्टिकचे कप वापरले जातात. अशावेळी या गरम अन्नपदार्थ व पेयांमध्ये बीपीए रसायन जलद गतीने शोषले जाते. दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या सततच्या हाताळणीमुळे आपल्या बोटांमधून, त्वचेमधून प्लॅस्टिकमधील रसायनांचा काही अंशी प्रवेश आपल्या शरीरात होत असल्याची शक्यता अनेक जगभरातील शास्त्रज्ञ व अभ्यासक वर्तवीत आहेत. प्लॅस्टिकमधील या काही रसायनांचा घातक परिणाम गरोदर स्त्रीया व लहान मुलांवर जलद गतीने होत असतो. प्लॅस्टिकचे विघटन होण्यास शेकडो वर्षांचा कालावधी लागतो याचे प्रमुख कारण म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपण फेकून देत असतो त्यावेळी निसर्गामधील बॅक्टेरिया त्यांचे विघटनीकरण (डिकंपोंझिंग) करण्याचे काम करीत असतात. हे बॅक्टेरिया नुसतेच अन्न नव्हे तर लाकूड, चामडे, कापूस, कापड, कागद व इतर घटक नष्ट करायचे काम काही कालावधीमध्ये करतात. या घटकांमधील अणुंची साखळी ही नैसर्गिकरीत्या एकमेकांशी जोडलेली असते.

यामुळे बॅक्टेरिया ही साखळी तोडू शकतात, परंतु प्लॅस्टिक घटक ही हायड्रो-कार्बनची एक साखळी आहे. यामधील अणुंची (आयटम) साखळी अत्यंत जटिल (कॉम्प्लिकेटेड) पद्धतीने एकमेकांशी जोडली गेली असते यामुळे बॅक्टेरिया, अल्गी ही साखळी सहजासहजी तोडू शकत नाही. ही साखळी तोडण्याची क्रिया अत्यंत संथगतीने चालते व यास शेकडो वर्षांचा कालावधी लागतो.

मुख्य म्हणजे निसर्गात बॅक्टेरियाच्या ६०० ते ७०० प्रजातींपैकी फक्त काहीच प्रकारचे बॅक्टेरिया काही प्रकारच्या प्लॅस्टिकचे विघटन करू शकतात. (सर्व बॅक्टेरिया नाहीत) ही गोष्ट  प्रामुख्याने लक्षात घेणे जरुरीचे आहे. शास्त्रज्ञ अभ्यास करून प्लॅस्टिकचे विघटन होण्यासाठी बॅक्टेरियांवर प्रयोग करीत आहेत.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकच्या बाटल्या व डबे वापरण्याऐवजी स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या व डबे वापरणे जास्त योग्य ठरेल. तसेच स्टेनलेस स्टील, तांबे, काचेच्या, माती, चिनीमातीच्या वस्तू या पर्यायांचा वापर केला पाहिजे. कागदी, कापडी, साड्यांच्या पिशव्यांचा वापर करावा. अशाप्रकारे ज्या प्लॅस्टिक वस्तूंना पर्याय उपलब्ध आहेत त्यांचा वापर करणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकच्या कचऱयाचे योग्य व्यवस्थापन नागरिक व शासकीय पातळीवर झाले तर अनेक समस्या मोठय़ा प्रमाणात आटोक्यात आणणे शक्य होईल.

(लेखक टेलस ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख आहेत.)

 

आपली प्रतिक्रिया द्या