अयोध्या विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ नाव

उत्तर प्रदेश सरकारकडून रामनगरी अयोध्या धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात येत आहे. अयोध्येत तयार होणाऱया विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील हे पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अयोध्येतील विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ’, अयोध्या असे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य विधानसभेने संमत केल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

राज्य सरकारकडून या विमानतळासाठी जवळपास 600 एकर जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाला उपलब्ध करून दिली जाईल. विमानतळ तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांच्या निर्मितीसाठी 525 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली. देशविदेशातील पर्यटकांसाठी इथे वेगवेगळ्या सोयी विकसित करण्यात येत आहेत. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत विमानतळाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या