अयोध्येच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिका, मुस्लिम पक्षाची सुप्रीम कोर्टात धाव

supreme-court

अयोध्या श्रीरामजन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात मुस्लिम पक्षाने शुक्रवारी पुनर्विचार याचिका दाखल केली. मुस्लिम पक्ष देशात शांती आणि सद्भाव कायम राखण्यासाठी नेहमीच आग्रही राहिला आहे, परंतु अयोध्या प्रकरणात आम्हाला न्याय हवा आहे असे म्हणणे याचिकेद्वारे मांडले आहे.

अयोध्या निकालाला आव्हान देण्याच्या अंतिम दिवशी ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी ही 70 पानी पुनर्विचार याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रातील एका परिच्छेदात ज्या गोष्टी बरोबर म्हटल्या आहेत त्या दुसऱया परिच्छेदात चुकीच्या ठरवल्या आहेत. 1992 साली मशीद पाडण्यात आली होती हे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. यावरून ती मुस्लिमांची नमाज अदा करण्याचीच जागा होती हे स्पष्ट होते असा दावा याचिकेत केला आहे. याप्रकरणी राजीव धवन यांच्या बरोबरीने जफरयाब जिलानी, शकील अहदम सय्यद, मोहम्मद परवेज डबास, उज्मी जमील हुसैन, दानिश अहमद सय्यद हे मुस्लिम पक्षाची बाजू मांडणार आहेत.

आणखी तीन याचिका
न्यायालयात शुक्रवारी आणखी तीन पुनर्विचार याचिका दाखल झाल्या. मौलाना मुफ्ती हस्बुल्ला, मोहम्मद उमर, मौलाना महफूजुर रहमान आणि मिशबहुद्दीन यांनी या याचिका दाखल केल्या असून ते याआधी चाललेल्या खटल्यात पक्षकार होते.

याचिकेतील मुख्य मुद्दे
– अयोध्येतील त्या जागेवर सन 1950 च्या आधी पूजा केली जात होती हा निर्मोही आखाडय़ाचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे, मग हिंदू त्या जागेवर का जात होते?
– आधी जमिनीचा मुद्दा होता, नंतर देवाचा मुद्दा कोठून आला?
– न्यायालय मशीद असल्याचे मानतेय, मग त्या मशिदीचा वापर मुस्लिमांशिवाय आणखी कोण करणार?
– बाबरने दुसरी वास्तू पाडून त्या ठिकाणी मशीद उभारल्याचा कोणताही पुरावा नाही.

आपली प्रतिक्रिया द्या