#AYODHYAVERDICT रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवली मुंबईत कडेकोट बंदोबस्त

914

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण शहरभर कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला आहे. संवेदनशील भागांसह वर्दळीची रेल्वे स्थानके, अति महत्त्वाची ठिकाणे आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा असणार आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. शुक्रवारी रात्री अयोध्या निकालाची तारीख जाहीर झाल्यावर सर्व पोलीस ठाण्यांना गस्त, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपेरशन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. पोलिसांच्या सुटय़ा रद्द करून त्यांना तातडीने हजर होण्याचे आदेश देण्यात आले. तर रात्रीपासूनच चेक नाक्यांवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर पोलीस लक्ष ठेवून होते. त्याचप्रमाणे प्रमुख रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलीस आणि आरपीएफचे जवान तैनात करण्यात आले. संशयित व्यक्ती दिसल्यास त्याची खात्री करा आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांसोबत एसआरपीएफ आणि आरपीएफच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस नजर ठेवून असणार आहेत.

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबरने एक विशेष पथक तयार केले आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ, मेसेज पसरून तेढ निमार्ण होऊ नये याची पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या