अयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्यायाधीश नजीर यांना झेड दर्जाची सुरक्षा

528

अयोध्या रामजन्मभूमीप्रकरणी निर्णय देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठातील न्यायाधीश अब्दुल नजीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरवादी संघटनेकडून नजीर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांना नजीर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

केरळमध्ये सक्रिय असणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि इतर काही कट्टरपंथी संघटनांकडून नजीर यांच्या जीविताला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. जस्टिस नजीर हे मूळ कर्नाटकचे आहेत. कर्नाटक सरकारकडून नजीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना बंगळुरू, मंगळुरू आणि राज्यातील इतर भागांमध्ये झेड दर्जाची सुरक्षा दिली जाईल. तसेच देशभरातही त्यांनी झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. झेड दर्जाच्या सुरक्षेत सीआरपीएफचे 22 जवान असतात.

अयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठात अब्दुल नजीर यांचा समावेश होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील  5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने अयोध्याप्रकरणी निकाल दिला. या घटनापीठात सीजेआय रंजन गोगोई यांच्यासह, न्यायाधीश एस. एस. बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर यांचा समावेश होता. या निकालानंतर नजीर यांच्या जीविताला धोका असल्याचा माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या