#AYODHYAVERDICT राम मंदिरासाठी लालकृष्ण आडवाणी यांचे योगदान महत्त्वाचे – उमा भारती

872

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राममंदिर निर्माणाबाबत दिलेल्या निकालाचे भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे राममंदिरासाठी योगदान दिलेल्या अनेक नेत्यांचाही त्यांनी उल्लेख केला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचे राम मंदिर निर्माणासाठीचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही भारती यांनी सांगितले.

राममंदिराचा मुद्दा पहिल्यांदा उपस्थित करत आडवाणी यांनी देशात राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षतता अधोरेखीत केली. आडवाणी यांनी राममंदिरासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. देशात राष्ट्रवादाची भावना रुजवण्यात आणि धर्मनिरपेक्षता जोपसण्यामागचे मूळ कारण आडवाणी असल्याचेच भारती यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लालकृष्ण आडवाणी यांना भेटण्यासाठी उमा भारती त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘लालकृष्ण आडवाणी यांच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी आपण येथे आलो आहोत. त्यांच्यामुळेच राम मंदिराचे स्वप्न सत्यात उतरले. त्यांनी राम मंदिराबाबत संसदेत केलेला युक्तिवाद आजही सर्वांच्या स्मरणात असल्याचे त्या म्हणाल्या.

जगभरात आज हिंदुस्थानचा दबदबा वाढला आहे. त्यामागे आडवाणी यांनीच प्रेरणा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या राममंदिराबाबतच्या आणि देशाहितासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळेच भाजपने केंद्रात सत्ता स्थापन केली आहे. आता यापुढेही केंद्रात भाजपचेच सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करताना या मुद्द्यासाठी योगदान देणाऱ्यांचेही स्मरण ठेवायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या