कोरोनाच्या संकटात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीचे महत्त्व पटवून द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

कोरोनाच्या संकटात आयुर्वेद, युनानी, होमिओर्पथीचे महत्त्व जगाला पटवून देण्याची हीच संधी आहे. उपचारांसाठी सर्व पॅथीच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांंनी मार्गदर्शक सूचना तयार करून टास्क फोर्सकडे द्याव्यात. ज्यामुळे रुग्णांवर तसे उपचार करून ते बरे होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आवाहन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ व वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आयुषच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी देखील राज्य शासनाने समिती नेमली आहे. उपचारामध्ये सर्व पॅथी महत्वाच्या असून त्यातील औषधांसाठी सर्वांनी मिळून राज्य शासनाला दोन पानी मार्गदर्शक सूचना तयार करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी विविध तज्ञांनी आपले मते मांडली. बैठकीस निमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, निमाचे मुंबई अध्यक्ष डॉ. संजय लोंढे, आयुर्वेदीक संघटनेचे डॉ. आशुतोष कुलकर्णी, युनानी कौन्सिलचे डॉ. खुर्शीद कादरी, होमिओपॅथी कौन्सिलचे डॉ. नितीन गावडे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुष उपचारासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, निमा, आय एम ए, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आयुषमधील औषधांची प्रतिबंधात्मक आणि उपचारासाठी अशा दोन भागात विभागणी करून तज्ज्ञांनी त्यासंबंधी ऊहापोह करावा आणि टास्क फोर्सकडे सर्वसमावेशक सूचना सादर कराव्यात.

आपली प्रतिक्रिया द्या