आयुष्मान भारत योजनेची नकली वेबसाईट बनवली, 4200 लोकांना गंडा

931

आयुष्मान भारत योजनेच्या नावाखाली खोटी वेबसाईट बनवून 4200 जणांची फसवणूक केल्याची घटना दिल्ली येथे घडली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आयुष्मान भारत अशाच नावाची एक दुसरी खोटी वेबसाईट तयार करण्यात आली होती. त्या वेबसाईटवर खोट्या जाहिराती देण्यात आल्या होत्या. त्यातच एक जाहिरात वॉर्डबॉय, परिचारिका यांच्या भर्तीची होती. या नोकरीच्या अर्जासाठी प्रत्येकाकडून 300 ते 500 रुपये घेण्यात आले होते. एका व्यक्तिला या नकली वेबसाईटचा संशय आला आणि त्यांचं भांडं फुटलं.

दिल्ली पोलिसांनी माग काढून चार जणांना अटक केली. या चार जणांपैकी काही जण वेब डिझायनरही आहेत. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी जवळपास 4200 जणांना फसवल्याचं कबूल केलं. या चार जणांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. पोलिसांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या