अक्षय्य आनंद देणारी ‘आखाजी’

542

<<प्रा. बी. एन. चौधरी>>

अक्षय्य तृतीयेचा संबंध खान्देशात सासर-माहेरच्या ऋणानुबंधाशीही जोडला गेला आहे. या सणाला सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. अक्षय्य तृतीयेलाच खान्देशात आखाजी म्हणून संबोधतात. अहिराणीत ‘आखाजी’विषयी अनेक गीतं आहेत. या गीतातून खान्देशातील संस्कृती, जनजीवन, कुटुंब व्यवस्था, सासर-माहेर, नातेसंबंध यांचे असंख्य पदर उलगडून जातात. सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय आनंद देणारी म्हणून अक्षय तृतीया ओळखली जाते. खान्देशी संस्कृतीचा हा समृद्ध वारसा समाजमाध्यमांच्या गोंगाटात हरवून जायला नको. तो नव्या पिढीने स्वीकारायला हवा, जपायला हवा.

अक्षय्य तृतीयेलाच खान्देशात आखाजी म्हणून संबोधतात. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिह्याच्या काही भागात प्रामुख्याने अहिराणी बोलीभाषा आहे. अहिराणीत ‘आखाजी’विषयी अनेक गीतं आहेत. या गीतातून खान्देशातील संस्कृती, जनजीवन, कुटुंबव्यवस्था, सासर-माहेर, नातेसंबंध यांचे असंख्य पदर उलगडून जातात. सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय आनंद देणारी म्हणून अक्षय्य तृतीया ओळखली जाते. अक्षय तृतीयेचा संबंध सासर-माहेरच्या ऋणानुबंधाशीही जोडला गेला आहे. या सणाला सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. माहेरच्या आपल्या माणसांत त्या आठ, दहा दिवस राहतात. सासरी केलेल्या श्रमाचा परिहार करतात व पुन्हा नवीन उमेद, जगण्याचं बळ घेऊन सासरी जातात. सासरी सोन्याचा धूर निघत असला तरी प्रत्येक सासुरवाशीण आखाजी (खान्देशच्या बोलीभाषेत) कधी येणार? म्हणून दिवस मोजत असते. माहेरी नेण्यासाठी भाऊ-वडील कुणी तरी ‘मुन्हाई’ होऊन येईल म्हणून वेशीकडून येणाऱ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ग्रामीण स्त्री आजही खेडय़ापाडय़ात दिसते.

आखाजीच्या दिवशी कुंभाराकडून आणलेल्या नव्या घागरी पाण्याने भरून पूजल्या जातात. खान्देशातील कृषीप्रधानताच यातून स्पष्ट होते. पाणी, नवांकुर, धनधान्य आणि अन्नाची पूजा हे त्याचेच द्योतक आहे. मुली काळ्या मातीत गव्हाची पेरणी करतात.

आखाजीपूर्वी सात दिवस पेरलेले गहू हिरवेगार होतात. त्याची पूजा म्हणजे हिरवाईचा, शेतीचाच हा गौरव. खेडेगावात झाडाझाडांना बांधलेला आणि झाडांच्या उंच शेंडय़ांशी स्पर्धा करणारा हिंदोळा माहेरवाशीण स्त्र्ायांचा जिवाचा सखा असतो. या झोक्यावर बसून उंच उंच झोके घेत ही स्त्र्ााr आपल्या सख्यांसह आखाजीची गाणी म्हणते. या गाण्यातून तिच्या मनातील भावना मुक्त होतात. बहिणाबाई चौधरी यांनाही आखाजी सणाला शब्दबद्ध करण्याचा मोह आवरता आला नाही. त्या म्हणतात-

आखाजीचा आखाजीचा,

मोलाचा सन देखाजी।

निंबावरी निंबावरी,

बांधला छान झोकाजी।

माझा झोका झोका माझा,

खेयतो वाऱ्यावरीजी।

गेला झोका गेला झोका,

चालला माहेराला जी।

आला झोका आला झोका,

पलट सासराले जी।

माझा झोका माझा झोका,

जिवाची भूक सरे जी।

सासर आणि माहेर यांना जोडणारा हा झोका जिवाची भूकदेखील विसरायला भाग पाडतो. हाच विचार आखाजीची अहिराणीतील गाणी पेरतात. आखाजीची गाणी म्हणजे फक्त गाणीच नाहीत तर तो एक अतिशय समृध्द असा वारसा आहे. मात्र जुन्या पिढीने पंरपरेने जपून आणलेला हा ठेवा आता लोप पावत आहे. तरीही अहिराणी कॅसेटवर तो संग्रहित होत आहे.

सासरच्या कामात रमलेली सासुरवाशीण माहेरी जाण्यासाठी आपल्या भावाची आतुरतेने वाट पाहात आपल्याच स्वप्नात दंग होत म्हणते-

खडके खडके राया पेरू, उगना का नई वं

भाऊ मन्हा वनस्पती, उनाका नई वं

गौराई सारखा तोडा माले, आनात का नई वं!

म्हणजे खडकाला फोडून वनस्पती जशी वर येते तसाच कितीही कठीण परिस्थिती असली तरी माझा भाऊ येईलच. तो आला की नाही? येताना त्याने गौराईसारखे तोडे, कड्ला, पाटल्या, येल्या, हार, नथ असे विविध अलंकार आणले की नाहीत? हा भाव या गीतात आहे.

दुसरीकडे आई आपली मुलगी माहेरी येणार म्हणून लगबगीने घरातील आवराआवर करीत असते. मुलीसोबत नातवंडे येतील, येथल्या चीजवस्तूंशी खेळतील म्हणून ती मुलास सांगते की, तू तुझी व्यवस्था नीट लाव. अन्यथा माझ्या लेकुरवाळ्या मुलीमुळे तुझी आंबा, नारळ, केळी पिकांची नासाडी होईल. हेदेखील ती एका पारंपरिक गीतातूनच सांगते-

माई रे भाऊ तुले मी गाऊ

वाटवर आंबा नको लावू

मनी गौराई लुकरवायी

तूना आंबांस्नी रौदय होई

या गीतातून आपल्या माहेरचं समृद्धपण ती सहजपणे व्यक्त करते. माहेर समृद्ध असलं तरी सासरी मात्र तिला काय, काय सोसावं लागतं याचा पाढा ती पुढील गीतातून मांडते.

एवढीशी गौराई ठुमकनी, माय ठुमकनी

नारयना झाड खाले जाई बठनी, माय जाई बठनी

इकाले गई तं देढ पैसा, माय देढ पैसा

सासूनी सांग्यात मिठ मिरच्या, माय मिठ मिरच्या

सासरानी सांगी तंबाखू, माय तंबाखू

देर नी सांगा झिंगी भवरा, माय झिंगी भवरा

ननिननी सांगा येल दोरा, माय येल दोरा

पतीनी सांगा पान पूडा, माय पान पूडा

या संसारले हात जोडा, माय हात जोडा

सासरच्या प्रत्येक माणसाची आठवण ठेवून त्यांच्या आवडीनिवडीचे भान ठेवत, त्या जपत या संसाराला हात जोडण्याची आगतिकता किती सहज शब्दबद्ध झाली आहे. गीताची लय, ठेका मनाचा लगेच ठाव घेतात.

अशा प्रकारे काही दिवस माहेरी राहूनही गौराई म्हणजे पार्वती आपल्या शंकरासोबत आनंदाने सासरी परतते. सासरचा जाच, त्रास कमी अधिक प्रमाणात आजही आहेच. त्याची तीव्रता विसरायला लावणारी ही आखाजीची गाणी म्हणूनच आजही ग्रामीण भागात तेवढय़ाच गोडीने गायली जातात. या गीतातून आखाजीची महती स्पष्ट होत असली तरी माहेर हे माहेर आहे व सासर-सासरच आहे हे सत्य या गीतातून डोकावताना दिसते. गीतातले शब्द साधे, सरळ असले तरी त्यातला आशय काळजाला हात घालणारा आहे. अशी ही गीतं खान्देशात गावागावात, खेडय़ापाडय़ात, वस्तींवर मैत्रिणींच्या गराडय़ात सामूहिकपणे म्हटली जातात. सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे माणूस माणसाला पारखा झाला आहे. त्याचा संवाद हरवला आहे. तो एकलकोंडय़ा झाला आहे. त्यात आलेल्या फेसबुक, व्हॉटस्अपसारख्या नव्या माध्यमांनी त्याला आपल्याच कोशात गुंतवून ठेवलं आहे. अशा परिस्थितीत मायेचा गारवा, ओलावा देणाऱ्या या गीतांची परंपरा जपली गेली पाहिजे. खान्देशी संस्कृतीचा हा समृद्ध वारसा समाजमाध्यमांच्या गोंगाटात हरवून जायला नको. तो नव्या पिढीने स्वीकारायला हवा, जपायला हवा. त्याचे संवर्धन करायला हवे, हीच काळाची गरज आहे.

आपली प्रतिक्रिया द्या