बाबा का ढाबावाल्या कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

बाबा का ढाबावाल्या कांता प्रसाद यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं आहे. कांता प्रसाद यांचा युट्युबर गौरव वासन याची माफी मागत पाया पडत असल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. गौरवने गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये कांता प्रसाद यांना कसं कष्टप्रद जीवन जगावं लागत आहे, याची कहाणी जगासमोर आणली होती. यानंतर कांता प्रसाद एका रात्रीत प्रसिद्ध झाले होते. प्रसिद्ध झाल्यानंतर कांता प्रसाद यांनी गौरव वासन याच्यावर मदतीच्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

व्हायरल व्हिडीओमुळे प्रसिद्ध झाले

कांता प्रसाद सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे प्रसिद्धीझोतात आले होते. त्यांचं दु:ख अनेकांना पाहावलं नाही, ज्यामुळे त्यांनी कांता प्रसाद यांना आर्थिक मदत केली होती. या मदतीमुळे कांता प्रसाद यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आणि त्यांनी एक हॉटेल सुरू केलं. मात्र 4 महिन्यांपूर्वी हे हॉटेल बंद पडलं, ज्यामुळे कांता प्रसाद पुन्हा एकदा त्यांच्या ढाब्याकडे वळाले होते. हे कळाल्यानंतर युट्युबर गौरव वासन याने या दुनियेत ‘कर्मापेक्षा मोठं काहीच नाही’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

गौरव वासनने त्याच्या युट्युब चॅनेलवर कांता प्रसाद यांची कहाणी दाखवली होती. आपण आणि आपली बायको कसं हलाखीचं जीवन जगतायत, दोन मुलं आणि मुलगी असूनही आपल्याला मदत करायला कसं कोणी पुढे येत नाही हे सगळं त्याच्या व्हिडीओमध्ये कांता प्रसाद यांनी सांगितलं होतं. दिवसरात्र जेवण करून आपण आपलं पोट भरतो, मात्र लॉकडाऊनमुळे आता ढाब्यावर कोणीच येत नसल्याने आपण आर्थिक संकटात सापडलो असल्याचं कांता प्रसाद यांनी रडत रडत सांगितलं होतं. त्यांना रडताना पाहून हृदयाला पीळ पडला होता. या व्हिडीओमुळे त्यांचं नशीब पालटलं आणि लोकांनी त्यांच्या ढाब्यावर गर्दी करायला सुरुवात केली. बऱ्याच लोकांनी त्यांना आर्थिक मदतही केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या