महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात! बाबा रामदेव यांचे वादग्रस्त विधान

baba-ramdev

योगगुरू बाबा रामदेव हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मात्र तरीही त्यांनी वादग्रस्त विधाने करणे सोडलेले नाहीये. ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना बाबा रामदेव यांनी महिलांच्या कपड्यांवरून एक विधान केले आहे, ज्याने नव्या वादाला जन्म दिला आहे. ‘साडीमध्ये महिला चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसतात, माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात’ असं विधान बाबा रामदेव यांनी केलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

योग शिबीर आणि महिलांचे महासंमेलन अशा दोन कार्यक्रमांचे ठाण्यामध्ये आयोजन करण्यात आले होते. योगासनांसाठी महिलांनी सलवार कमीज परीधान केली होती आणि महासंमेलनासाठी त्यांनी सोबत साड्या आणल्या होत्या. मात्र योगा शिबीर आणि महासंमेलनाच्या दरम्यान अवधी न मिळाल्याने महिलांना सलवार कमीज ऐवजी साड्या परीधान करता आल्या नव्हत्या. याबाबत बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात. आणि माझ्या नजरेने काही घातलं नाही तरी चांगल्या दिसतात. बाबा रामदेव यांच्या या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.