माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ते सर्वच सराईत गुन्हेगार असून त्यातील तिघांवर गंभीर गुह्यांची नोंद आहे. या आरोपींची कारागृहात असताना ओळख झाली. तेथून बाहेर आल्यावरही ते एकमेकांच्या संपका&त होते. त्याच ओळखीतून ते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी झाल्याचे समजते. दाऊद टोळीप्रमाणेच बिष्णोई गँगची मोड्स ऑपरेंडी होती असे दिसून आले आहे.
गेल्या शनिवारी वांद्रे येथील खेरनगर परिसरात बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. प्रत्यक्ष गोळीबार करणारा शिवकुमार गौतम हा मुंबईबाहेर सटकण्यात यशस्वी ठरला. परंतु त्याच्यासोबत तेव्हा असलेले धर्मराज कश्यप आणि गुरनेल सिंह हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर पोलिसांनी या गुह्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा शुभम लोणकर याचा मोठा भाऊ प्रवीण लोणकर याच्या मुसक्या आवळल्या. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त लखमी गौतम, उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण थोरात, महेश देसाई, घनश्याम नायर यांनी आरोपींकडे कसून चौकशी केली. शिवाय मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुह्यातील आणखी पाच आरोपींची माहिती मिळवली. त्यानुसार नितीन सप्रे, संभाजी पारधी, राम कनोजिया, प्रदीप ठोंबरे आणि चेतन पारधी अशा अन्य पाच जणांना कर्जत, अंबरनाथ आणि डोंबिवली परिसरातून उचलले. हे पाचही अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. तर राम, संभाजी आणि नितीन यांच्यावर हत्या, दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
बाबा सिद्दिकी यांचा अंगरक्षक निलंबित
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार होऊन आरोपी पळाले. परंतु त्यावेळी सिद्दिकी यांच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या पोलीस अंमलदाराकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे याची गंभीर दखल घेत त्या अंगरक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अंमलदार सोनावणे हे बाबा सिद्दिकी यांच्या रक्षणासाठी हत्याकांड घडले तेव्हा तैनात होते. गोळीबार होण्यापूर्वी बाबा सिद्दिकी कार्यालयात होते. तेव्हाही ते अंगरक्षक तेथे होते. मात्र जेव्हा प्रत्यक्षात सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला आणि आरोपींनी पळ काढला तरीही अंगरक्षकाकडून काहीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्या अंगरक्षकावर खात्यांतर्गत निलंबनाची कारवाई करण्यात आली.