बाबरी: गुन्हेगारी कटाचा आरोप निश्चित

सामना ऑनलाईन । लखनौ

आयोध्येतील बाबरी पतनप्रकरणी सीबीआय न्यायालयाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह १२ जणांवर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप निश्चित केला आहे. तत्पूर्वी न्यायालयाने या सर्वांचा ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
आरोप निश्चितीच्या सुनावणीसाठी सर्वांनी हजर राहावे असे आदेश न्यायालयाने १९ मे रोजी दिले होते. त्यानुसार लालकृष्ण आडवाणी, डॉ. जोशींसह १२ जण आज लखनौतील उच्च न्यायालयात हजर झाले. या खटल्यातून सर्व १२ जणांची मुक्तता करावी अशी मागणी न्यायालयात यावेळी करण्यात आली. त्यासाठी डिस्चार्ज अर्ज न्यायालयात दिला. न्यायालयाने अर्जावर विचार करण्यासाठी निर्णय राखून ठेवला. तसेच सर्व बारा जणांना जामीन मंजूर केला. परंतु बाबरी मशीद पतनामागे गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप १२० बी कलमाखाली निश्चित केला आहे. दरम्यान, आज न्यायालयाने लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारती, भाजपचे खासदार विनय कटीयार, साध्वी ऋतुंभरा, विष्णू हरी दालमिया, राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख नृत्य गोपाल दास, रामविलास वेदांती, वैकुंठलाल शर्मा ऊर्फ प्रेमजी, चंपतराय बन्सल, धर्मदास आणि सतीश प्रधान यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशाने रोज सुनावणी
१९९२च्या बाबरी पतनानंतर कारसेवकांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याचा खटला लखनौ न्यायालयात सुरू होता. दुसऱया एफआयआरमध्ये लालकृष्ण आडवाणींसह काही नेते आणि महंतांची नावे होती. त्याचा खटला रायबरेली कोर्टात सुरू होता. २००१ मध्ये सीबीआय न्यायालयाने कटाच्या आरोपातून आडवाणींसह इतरांची नावे वगळली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये नावे वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात हा खटला नव्याने सुरू करून गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे सीबीआयने यासाठी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लखनौत सीबीआय न्यायालयात रोज सुनावणी सुरू आहे.