महावितरणचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव निलंबित

52

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली येथील विज महावितरणचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी हे आदेश काढले आहेत. जालना येथे कार्यरत असताना कामात अनियमितता व वरिष्ठाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर महावितरणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हिंगोलीत रुजू होण्यापूर्वी बाबासाहेब जाधव हे जालना येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मंडळ कार्यालयात अधीक्षक अभियंता म्हणुन कार्यरत होते. वर्ष २०१५-१६ साठी जालना जिल्हाला महावितरण कडून १७८.६८ लाख रूपयांचा निधी मंजुर झाला होता. मात्र जाधव यांनी२१६.८० लाख रूपयांचे ९८ कार्यादेश प्रदान केले. तसेच २ कोटी रूपयांचे ४ कार्यादेश कोटेशन पद्धतीने दिले. यासोबतच वर्ष २०१६-१७ मध्ये एकूण निधि १५०.५५ लाख मंजूर असताना ४६९.८० लाख रूपयांचे २२२ कार्यादेश प्रदान केले. मंजूर निधीच्या तुलनेत २० टक्के जादा निधीची कामे दिल्याचा ठपका अधीक्षक अभियंता जाधव यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

हिंगोली येथे देखील बाबासाहेब जाधव यांची कार्यपद्धती वादग्रस्त ठरली होती. विज कर्मचाऱ्यांनी जाधव यांच्या विरुद्ध आंदोलन देखील केले होते. दरम्यान, महावितरणचे संभाजीनगर येथील सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी बाबासाहेब जाधव यांना अधीक्षक अभियंता पदावरुन निलंबित केले आहे. निलंबन काळात जाधव यांनी नांदेडच्या मुख्य अभियंता कार्यालयात सोमवार व गुरुवारी हजेरी द्यावी तसेच पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असे ही बजवाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या