स्वतःचे संपूर्ण इंग्रजीकरण करणे ही गुलामगिरी-बाबासाहेब पुरंदरे

104

सामना ऑनलाईन । नागपूर

फ्रान्स मधील लोकांना इतिहासाबद्दल इतके प्रेम की तो त्यांना प्रेरणास्त्रोत वाटतो आणि तो इतिहास एका गैर फ्रेंच नागरिकाने फ्रेंच भाषेतच ऐकावा, असा त्यांचा अट्टाहास असतो. आपल्याकडे मात्र, वेगळे धोरण आहे. इकडे इंग्रजीत बोलावे लागते. स्वतःचे संपूर्ण इंग्रजीकरण करणे म्हणजे ही गुलामगिरी असल्याचे खडे बोल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सुनावले.

शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरुदास महाराज यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त पूर्व लक्ष्मीनगरातील व्हॉलिबॉल ग्राऊंडमध्ये ‘शिवकल्याण राजा’ संगीत व निरुपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी पं. हृदयनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर व विभावरी जोशी यांनी शिवछत्रपतींचा गुणगौरव करणारी गाणी सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर रचित शिवरायांच्या आरतीने ‘जय देव जय देव जय जय शिवराया’ने झाली. त्यानंतर, त्यांनी राम गणेश गडकरी रचित ‘गुणी बाळ असा जागसी का रे बाळा’ ही अंगाई, सावरकर रचित ‘हे हिंदूनृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ यासोबतच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, ‘आनंदवन भुवनी’, ‘राज्याभिषेक गीत’ आणि ‘निश्चयाचा महामेरू’ ही गाणी सादर केली. आपण आपला उज्ज्वल इतिहास जाणून घेतला पाहिजे. परंतु, जानोजी भोसल्यांनी पराक्रम गाजवून विजयी पताका फडकावणारी तलवार नागपुरातच आहे, हे आम्हाला माहीत नाही. अशी आपली मानसिकता असल्याचा प्रहार पुरंदरे यांनी या वेळी केला.

आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य हे इतिहासाच्या प्रेरणेचे द्योतक आहे. परंतु, त्या स्वातंत्र्याचे कुणाला काय? आज नको त्या घोषणा ऐकून क्रांतिकारक वेडे होते काय? असा प्रश्न मनाला भिडतो. त्यांचे ते वेडेपण आज कोणी जगेल काय? असा सवालही पुरंदरे यांनी या वेळी उपस्थित केला.

आपली प्रतिक्रिया द्या